गुरुवारी पाणी पुरवठा बंद त्यानंतर पुढील तीन दिवस विस्कळीत ; नागरिक त्रस्त.. उपाययोजना करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलचे पाणीपुरवठा विभागाला पत्र
पुणे : वाढता उन्हाळा, तापमानवृद्धी आणि पर्यायाने खालावत जाणारी पाणी पातळी यामुळे पुणे शहरात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून याच कारणाने शहरात दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्यानंतर पुढचे तीन दिवस, अनुक्रमे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने प्रचंड पाणी टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे यावर योग्य उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलच्या वतीने पाणी पुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहे. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलचे अध्यक्ष नितिन कदम, समन्वयक स्वप्नील दुधाने व अर्बन सेलचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
देण्यात आलेल्या निवेदनात खालील मागण्या व मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.
- गुरुवार नंतर विस्कळीत होणारा व कमी दाबाने येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीतपणे चालु होण्याबाबत त्वरित उपाययोजना कराव्यात.
- ज्या ठिकाणी गुरुवारनंतर पाणी पुढील तीन ते चार दिवस पुरेशा दाबाने येत नाही असा सर्व भाग निश्चित करुन त्यांना गुरुवारी पाणी पुरवठा बंद न ठेवता कमी वेळ पाणी दिल्यास पुढील दिवस त्रास होणार नाही. तसेच अश्या सर्व ठिकाणी पुढील दोन तीन दिवस सदर विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करण्याकरिता आपल्या पाणीपुरवठा विभागामार्फत कर्मचारी अथवा अधिकारी नेमावा.
- बऱ्याच ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे मुख्य कारण Air Lock होण्याचे कारण आपल्या
विभागाकडुन दिले जाते. मात्र त्यावर Air Volve बसवुन अथवा इतर उपाययोजना केल्या जात नसल्याचे निदर्शनास येते. तरी प्रश्न निर्माण होण्याआगोदर त्यावर उपाययोजना केल्यास अशा आपत्कालीन वेळेस या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

वरील सर्व मुद्दे विचारात घेऊन त्यावर योग्य त्या उपाययोजना करुन हा विस्कळीत झालेला पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दर गुरुवारी घोषित तर पुढील तीन दिवस अघोषित पाणी पुरवठा बंदने नागरिक हैराण झाले आहेत. गुरुवारच्या पाणी बंद मुळे आठवड्यातील तीन दिवसच सुरळीत पाणी पुरवठा होताना दिसत आहे. गुरुवारी पाणी बंद ठेवल्यानंतर पुढचे सहा दिवस पाणी नियमित येण्यासाठी प्रशासन काहीच करताना दिसत नाही. एक दिवस पाणी बंद ठेवून पुढे तीन दिवस पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही हे माहीत असताना प्रशासनाने कोणत्याच उपाय योजना केलेल्या नाहीत. मुळात एक दिवस पाणी कपात हे केवळ संगण्यापुरते आहे का ? असा सवाल स्वप्नील दुधाने यांनी उपस्थित केला आहे.












