कर्वेनगर चौकातील उड्डाण पुलाचा पिलर खचल्याने एका बाजूला झुकला असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास ; धोका टाळण्यासाठी तातडीने उपाययोजनेची मागणी

पुणे : कर्वेनगर च्या मुख्य चौकात असणाऱ्या उड्डाणपुलाचा पीलर खचला गेला असून तो एका बाजूला झुकला गेल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. पिलर खचून पुलाच्या आतील भिंतीला टेकल्याचे दिसत आहे. हा प्रकार धोकादायक असून कोणती दुर्घटना घडण्या आगोदर याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने पाहणी करून तातडीने खुलासा करण्याची आवश्यकता आहे.
कर्वेनगर च्या मुख्य चौकात असणाऱ्या उड्डाणपुलाचा श्री साई मंदिरासमोरील एक पिलर खचूनभिंतीला टेकल्याने भिंतीला फुगवटा निर्माण झाल्याचे भाजपचे पदाधिकारी विनोद मोहिते व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले आहे. या पुलाची पाहणी केली असता पिलर खालच्या बाजूला खचून झुकलेला दिसत आहे. झुकल्याने पिलर आतील भिंतीला टेकल्याने भिंत फुगून बाहेर आल्याचे दिसून येत आहे. याच पिलरला समांतर असलेला पिलर सरळ उभा दिसत असून त्याचे भिंती मधील अंतर कायम असल्याचे दिसून येत आहे.
उड्डाण पुलाबाबतीतला या प्रकार गंभीर असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे. पुलावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. यात अवजड वाहनांचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत व पुलाच्या सर्वच पुलाची पाहणी बारकाईने करावी अशी मागणी विनोद मोहिते यांनी केली आहे. याबाबत आपण पालिकेशी पत्रव्यवहार सुरू केला असल्याचे मोहिते यांनी सांगितले.













