कर्वेनगर चौकातील उड्डाण पूलाची अधिकाऱ्यांनी केली पाहणी ; पुढील कार्यवाहीसाठी प्रकरण संबधित विभागाकडे

कर्वेनगर : कर्वेनगरच्या मुख्य चौकात असणाऱ्या उड्डाणपुलाचा पीलर एका बाजूला झुकला गेल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे. पिलर लागून असलेली भिंत ही फुगल्याचे दिसत आहे. ही बाब स्थानिकांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी पिलरची व भिंतीची पाहणी केली आहे.
वरील विषय निदर्शनास आणून देत भाजपचे विनोद मोहिते यांनी प्रशासनाने तातडीने या विषयाकडे लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे महापालिका सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांच्याकडे केली होती. त्यानंतर जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजना (जेएनएनयुआरएम) चे कार्यकारी अभियंता वायसे व महापालिका सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम यांनी पुलाच्या फुगलेल्या भिंतीची व पिलरची पाहणी केली आहे.
आम्ही पुलाची पाहणी केली असून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे माहिती पाठवण्यात आली असल्याचे राजेश गुर्रम यांनी सिंहासन न्यूजशी बोलताना सांगितले आहे.

कर्वेनगर च्या मुख्य चौकात असणाऱ्या उड्डाणपुलाचा श्री साई मंदिरासमोरील पिलर झुकल्यासरखा दिसत असून पिलर आतील भिंतीला टेकला आहे, भिंत फुगून बाहेर आल्याचेही दिसून येत आहे. याच पिलरला समांतर असलेला पिलर व भिंती मधील अंतर कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हा नक्की प्रकार काय असा सवाल उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांनी पाहणी केली असल्याने नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे आता पुढे येणे आवश्यक आहे.






