पुणे जिल्हा

अमोल कोल्हे यांना हिरवा कंदील पार्थ पवारांचे काय?

राजेंद्र पंढरपुरे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिरूर मतदारसंघातील उमेदवारीचा प्रश्न प्राधान्याने संपवून टाकलेला आहे. आता प्रश्न उरतो तो मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार की नवीन उमेदवार? हा प्रश्न अर्थातच कुतूहलाचा बनला आहे.

पुणे जिल्ह्यात पुणे शहर, बारामती, शिरूर आणि मावळ असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. पैकी पुणे शहर वगळता उर्वरित तीन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे होते. बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून डॉ.अमोल कोल्हे विजयी झाले. मावळमधून राष्ट्रवादीचे पार्थ पवार पराभूत झाले.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी सुप्रिया सुळे यांना मिळणार हे निश्चित आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे इच्छुक असल्याचे फलक लागले आणि शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक मुंबईत झाली आणि त्यानंतर दोन दिवसांतच ‘भावी खासदार विलास लांडे ‘ असे फलक शिरूर मतदारसंघात लागले. लांडे यांना कोणी नेत्याने शब्द दिला असावा, अशी शंका निर्माण झाली. त्यातून अमोल कोल्हे की विलास लांडे अशी स्पर्धा लागली.

परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही चर्चा वाढण्यापूर्वीच डॉ.अमोल कोल्हे यांच्या बाजूने कौल दिला आणि उमेदवारीचा विषय संपविला. निवडणूक लढण्याबाबत अमोल कोल्हे द्विधा मन:स्थितीत असल्याचे बोलले जात होते. पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना थेट प्रश्न विचारला. कोल्हे यांनी होकार दिल्यावर पक्षाकडून त्यांची उमेदवारी निश्चित झाली.

Fb img 16837376233493064729888638918603

पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपला उमेदवार उभा करायचा आहे. परंतु काँग्रेस पक्ष पुणे शहर मतदारसंघावरील आपला दावा मागे घेण्यास तयार नाही आणि काँग्रेस पक्ष हा मतदारसंघ सोडेल, अशी कोणतीही स्थिती नाही. जागावाटपाची प्राथमिक बोलणी सध्या चालू आहेत, त्यामुळे दावे-प्रतिदावे होणारच. परंतु २०१९ सालच्या सूत्रानुसार पुणे जिल्ह्यातील तीन जागा राष्ट्रवादीला आणि एक जागा काँग्रेसला अशीच तडजोड आघाडीत होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पातळीवर संपलेला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण? हे अद्याप ठरलेले नाही. माजी मंत्री आदिती तटकरे मावळमधून उभ्या राहतील अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. २०१९ साली निवडणूक लढवलेल्या पार्थ पवार की आदिती तटकरे यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळणार याची चर्चा चालू आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये