सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. या नियुक्तीची घोषणा कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांनी केली. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रविंद्र कुलकर्णी तर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. संजय घनश्याम भावे यांची नियुक्ती केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना विद्यापीठ कायद्यात बदल करण्यात आला होता. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याला मान्यता दिली नव्हती. त्यावेळी विरोधी पक्षात असलेल्या भाजपने देखील मविआ सरकारच्या विद्यापीठ कायद्याला विरोध केला होता. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मात्र या सरकारने मविआ सरकारने केलेले कायद्यातील बदल रद्द केले. या सर्व घडामोडीमध्ये कुलगुरुपदाच्या निवड प्रक्रीया रखडली होती. दरम्यान आज कुलपती बैस यांनी कुलगुरुपदांच्या नावांची घोषणा केली आहे.


