देवतांना नैवेद्य स्वरूपात दाखवले जाणारे अन्न जात आहे मोठ्या प्रमाणात वाया ; चेतन भालेकर यांचे नागरिकांना महत्वाचे आवाहन

पुणे : अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे आपण म्हणतो परंतु हेच अन्न जर मोठ्या प्रमाणावर वाया जात असेल तर आपण त्या अन्नाचा अपमान करतोय असेच म्हणावे लागेल. सध्या आखाड महिना चालू असल्याने रोज देव देवतांना नैवेद्य दाखवले जात आहेत, परंतु अन्नचाच एक भाग असलेला नैवेद्य मोठ्या प्रमाणावर वाया जात असून अक्षरशः कचरा पेट्यांमध्ये टाकून द्यावा लागत आहे. आज समाजातील काही घटकांना एकावेळी खायची भ्रांत आहे, अशावेळी असे अन्न वाया जात असेल तर ही मोठी खेदाची बाब आहे.
हा प्रकार थांबावा यासाठी कर्वेनगर मधील चेतन भालेकर यांनी पुढाकार घेतला असून अशा प्रकारे देवतांपुढे नैवेद्य ठेवून अन्न वाया घालवण्यापेक्षा शिधा स्वरूपात धान्य देवस्थान ट्रस्ट कडे जमा केल्यास त्याचा चांगला सदुपयोग होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी देवतांपुढे नैवेद्य न ठेवता त्या त्या ट्रस्ट कडे शिधा द्यावा असे आवाहन भालेकर यांनी केले आहे. प्रत्येक भागातील देवस्थान ट्रस्टने ही त्याबतीत नियोजन करावे असे त्यांनी म्हंटले आहे.
आखाड महिना चालू असल्याने नागरिकांकडून देवदेवतांना नैवेद्य दाखवला जात आहे. हा नैवेद्य दाखवला जात असताना त्यावरून पाणी ओवाळून टाकले जात असल्याने नैवेद्य पूर्ण ओलसर होत आहे, त्यामुळे तो मुक्या प्राण्यांनाही खाता येत नाही. या प्रकारामुळे दाखवण्यात आलेला नैवेद्य पूर्णपणे टाकून द्यावा लागत आहे आणि यात मोठ्या प्रमाणावर अन्नाची नासाडी होत आहे.

नैवेद्य दाखवण्यापेक्षा नागरिकांनी ज्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जाणार आहे त्या ठिकाणच्या देवस्थानला शिधास्वरूपात जमेल तेवढे धान्य दिल्यास त्याचा फायदा समाजातील गरजू लोकांना करून दिला जाईल व अन्नाची मोठ्या प्रमाणावर होणारी नासाडी थांबेल. त्यामुळे वरील आवाहनाचा नागरिकांनी विचार करावा. तुम्ही देवावरील श्रद्धेपोटी नैवेद्य दाखवता पण तो कोणाच्या पोटात जात नाही तो वाया जातो शिधा स्वरूपात नैवेद्य जमा केल्यास तो कोणाच्या पोटात जाईल व गराजुंची भूक भागवली जाईल असे चेतन भालेकर यांनी म्हंटले आहे.









