फोडा फोडीच्या राजकारणाला सामान्य माणूस कंटाळलाय, नितिन गडकरींचे भाजपला खडे बोल

राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला सर्वसामान्य माणूस कंटाळलाय. महाराष्ट्रातील राजकीय परंपरा देशातील राजकारणापेक्षा वेगळी आहे, पण आता थोडे जास्त झाल्यासारखे वाटते, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपलाच खडे बोल सुनावले.
भाजपच्या डर्टी पॉलिटीक्सला बळी पडून अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकवले. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितीन गडकरी यांनी परखड मत व्यक्त केले. गडकरी म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात वैचारिक मतभेद असतील, पण मनभेद नव्हते. मी तब्बल 18 वर्षे विधिमंडळात होतो. मी कठोर टीका करायचो, सर्वांशी माझी वैयक्तिक मैत्री होती, पण आता थोडेसे जास्त झाल्यासारखे वाटते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य माणसाला याचा कंटाळा आलाय. नेत्यांपेक्षा मीडियाच यास जास्त कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले.

देशात विचारभिन्नता ही समस्या नाही तर विचारशून्यता समस्या आहे. तुम्ही कोणत्याही पक्षाच्या विचाराचे असला तरी तुम्ही तुमच्या विचारांशी प्रामाणिक राहिले पाहिजे. मुळात याला मतदार जबाबदार आहेत. जसे आपण मुलीसाठी नवरदेव पाहतो, सासू-सासरे कसे आहेत? घर कसे आहे? याचा विचार करतो. मग मत देताना का गांभीर्याने विचार करत नाही? हा माझ्या जातीचा, हा माझ्या भाषेचा म्हणून मतदान केले जाते. जनता ज्या दिवशी विचारपूर्वक मतदान करण्याचे ठरवेल, त्या दिवशी राजकारणात आपोआपच बदल होतील, असे गडकरी म्हणाले.
माझी दिल्लीत जायची इच्छा नव्हती
मी भाजपचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. माझी दिल्लीत जाण्याची इच्छा नव्हती, परंतु परिस्थिती अशी उद्भवली की, मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो. त्यामुळे मला दिल्लीत जावे लागले. मग दिल्लीत गेल्यानंतर मी महाराष्ट्रात न परतण्याचा निर्णय घेतला. आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छाच नव्हती, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.






