महापालिकेच्या निवडणुका लवकरच, राज्यातील बदललेली समीकरणे निवडणुकीत अनुकूल ठरण्याची भाजपला अपेक्षा

अजित पवार यांनी राजकीय भूकंप करीत सत्तेत सहभागी झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.हि बदललेली राजकीय समीकरणे भाजपाला निवडणूकीत अनुकूल ठरण्याची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांत महापालिका, जिल्हा परिषद या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे.
राज्यातील शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांमध्ये उभी फूट पाडल्यानंतर भाजपने आपल्यासोबत आलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँगेसच्या गटांच्या सहाय्याने आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवूनच पुढीलवर्षी होणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे यश मिळविण्यासाठी पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर पावसाळा संपताच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्याची शक्यता वाढली आहे.

अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाला निवडणूकीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या दोन प्रमूख पक्षांमध्ये उभी फूट पडल्याने त्यांची ताकद कमी झाली आहे. याचाच फायदा घेऊन राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळविण्यासाठी भाजप नेते निवडणुकांच्या तयारीला लागतील. अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, नवी मुंबई,सोलापूर, नागपूर सारख्या मोठ्या महापालिकांसह बहुतांश महापालिकांच्या तसेच अनेक जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका रखडल्या आहेत. सध्या या ठिकाणी प्रशासकराज असल्याने सर्व सामान्य नागरिकांना देखील विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासन आणि नागरिक यामधील महत्वाचा दुवा असलेले लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनाकडून कामे होत नसल्याची तक्रार नागरिक आणि राजकीय कार्यकर्ते करताना दिसत आहे.
सर्वच पक्षाचे कार्यकर्ते देखिल निवडणुकांकडे लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे सोबत असलेल्या मित्र पक्षांच्या साथीने मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, नागपूरसह मोठ्या महापालिका आणि जिल्हा परिषदा ताब्यात घेण्यासाठी भाजपच्या दृष्टीने हीच योग्य वेळ असून लोकसभेपुर्वी अर्थात येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणुका घेण्याची तयारी आहे, अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखिल कालच मुंबईमध्ये येत्या ऑक्टोबरमध्ये मुंबई महापालिकेची निवडणुक होउ शकते, अशी शक्यता व्यक्त केल्याने चर्चेला दुजोरा मिळत आहे.



केंद्रामध्ये सलग तिसर्यांदा भारतीय जनता पक्षाचे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. परंतू राज्यात एकटयाच्या बळावर लोकसभेत अपेक्षित यश मिळत नसल्याने भाजपने वर्षभरापुर्वी महाविकास आघाडी सरकार पाडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ५० आमदार फोडून राज्यात सत्ता स्थापन केली. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देउनही वर्षभरामध्ये अपेक्षित यशाची खात्री नसल्याने नुकतेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोठया गटाला राज्य शासनामध्ये एन्ट्री देण्यात आली. यामुळे शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. या दोन्ही पक्षातील गट आपसात झुंजत असताना कॉंग्रेसने अद्याप म्हणाविशी तयारी केलेली नाही. लागोपाठच्या लढायांमध्ये विरोधकांचा पराभव करण्यासाठी या संधीचा फायदा उचलत भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांवर पुन्हा ताबा मिळविण्याच्या तयारीत आहे.