पुण्यातील टेकड्यांवर स्वच्छता ठेवली जावी,वनविभागाचे दुर्लक्ष-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विधानसभेत मागणी

मुंबई : पुणे शहरातील वेताळ टेकडीसह अन्य ३५ टेकड्या हे पुण्याचे वैभव आहे. मात्र, अलीकडे या टेकड्यांवर अस्वच्छता दिसत असून वनखात्याचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारने त्यात लक्ष घालून कचरा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई करून स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत आज (गुरुवारी) केली.
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पुण्यातील टेकड्यांच्या स्वच्छतेबद्दल पॉइंट ऑफ इन्फर्मेशन शिरोळे यांनी उपस्थित केला. पुणे हे टेकड्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात सुमारे ३० ते ३५ टेकड्या आहेत. त्यात वेताळ, तळजाई, म्हातोबा, आणि पर्वती आदी टेकड्या प्रसिद्ध आहेत. सध्या टेकड्यांची अवस्था दयनीय झाली आहे. काही समाजकंटक टेकड्यांवर कचरा टाकतात. डंपरमध्ये किंवा ट्रकमध्ये राडारोडा भरून टेकडीवर ओतला जातो. काहीजण प्लास्टिक बॅगमध्ये कचरा भरून बेफिकीरपणे टेकड्यांवर टाकून देतात, असे आमदार शिरोळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. वेताळ टेकडीवरील चंदनाची झाडे तोडली जातात, या प्रकाराकडेही लक्ष वेधले.

विविध टेकड्यांवर अनेक पुणेकर ग्रुप करून स्वच्छता अभियान राबवितात. मात्र, काही समाजकंटक रात्रीच्या वेळी टेकड्यांवर बेगुमानपणे वागून अस्वच्छता करतात. मात्र, वनविभागाचे याकडे लक्ष नाही, असा आरोप आमदार शिरोळे यांनी केला.
टेकड्यांवर कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर तातडीने दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. शहरातील वेताळ टेकडी आणि अन्य टेकड्यांवर स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली.












