पुणे शहर

रक्तदान शिबिरात ८४ जणांनी केले रक्तदान

आचार्य आनंद ऋषीजी पुणे ब्लड बँक, रोहन कृतिका को-ऑपरेटिव्ह सोसायटी, यांच्या वतीने आयोजन

पुणे : कोविड १९ च्या जागतिक संकटामध्ये पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत आहे. अनेक रुग्णांना रक्ताअभावी उपचार मिळण्यास अडचणी येत आहेत. याचा विचार करून आचार्य आनंद ऋषीजी पुणे ब्लड बँक आणि रोहन कृतिका को-ऑपरेटिव्ह सोसायटी, सिंहगड रोड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ८४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन डॉ. राहुल कुलकर्णी आणि डॉ. अमित वाळिंबे यांनी रक्तदान करुन केले. याप्रसंगी पुण्यनगरीचे माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, माजी महापौर अंकुश काकडे, रोहन कृतिका सोसायटीचे चेअरमन राजेंद्र देसाई, सर्व कमिटी मेंबर आणि अनेक रहिवासी उपस्थित होते.  

रक्तदाना सारखे पवित्र आणि श्रेष्ठ दान करताना विशेष आनंद वाटत असल्याच्या भावना अनेक रक्तदात्यांनी यावेळी व्यक्त केल्या. रोहन कृतिका सोसायटीमध्ये गेल्या अडीच वर्षात चंदन सुरतवाला यांच्या मार्गदर्शनाखाली हे तिसरे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. आधीच्या दोन्ही रक्तदानाच्या वेळेप्रमाणेच यावेळी देखील शिबिराला रहिवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभला.

रोहन कृतिका सोसायटीमध्ये अनेक डॉक्टर वास्तव्यास आहेत आणि कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकटात सर्व डॉक्टर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देवदूतासारखे काम करत आहेत. आजचा उपक्रम खऱ्या अर्थाने अशा कोरोना योध्यांना समर्पित असल्याची भावना आनंदऋषीजी ब्लड बँकेच्या वतीने चंदन सुरतवाला यांनी व्यक्त केली.  ते म्हणाले आजच्या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक महिला आणि तरुणांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान केले. तसेच प्रत्येक सोसायटीने अशा प्रकारचा उपक्रम घेऊन या उदात्त सामाजिक कार्यास हातभार लावावा. 

या पवित्र उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे संजय भाईक यांनी कार्यक्रमात आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये