वेल्हे तालुक्यातील कादवे गावाच्या तळमाळावर आढळली कातळ शिल्प कलाकृती

इतिहास संशोधक मंडळाचे आजीवन सदस्य असलेले मंगेश नवघने यांनी घेतला शोध..
पुणे : पुणे जिल्ह्याच्या हवेली व वेल्हा तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या आंबी व कादवे या दोन्ही गावच्या सीमेवर डोंगरावर खडकाच्या पुष्ठ भागावर प्राचीन कोरलेली काही रेखाटन आढळून आली आहेत. इतिहास संशोधक मंडळाचे आजीवन सदस्य असलेले मंगेश नवघने यांनी याचा शोध घेतला आहे.
मंगेश नवघने म्हणाले, पानशेत धरणाचे फोटो घेण्यासाठी आम्ही 3 मित्र डोंगरचा माळ अन् त्यावर असलेले पाण्याच्या अवतीभवती फिरत असताना आम्हाला कोरलेली शिल्पे आढळून आली आहेत.

रिंग असलेले कप , जोडलेले कप , शेपटी कप , एककेंद्री वर्तुळ , कोन, शिवलिंग, ठिपके असे प्रकार या शिल्पात आम्हाला आढळल्या आहेत. या काळ्या खडकावर अनुकुचीदर हत्याराने ही चिन्हे कोरली गेली असावीत.
यावेळी नवघने यांच्या बरोबर वेल्हा तालुकाचे स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय जागडे व मुळशी उपाध्यक्ष अनिल कडू हे उपस्थित होते. ही सापडलेल्या शिल्पकृतीबाबत पुरातत्व विभागाच्या संशोधकांना माहिती दिली असून याचा अभ्यास केला जाणार असल्याचे नवघने यांनी सांगितले.



या संदर्भात डेक्कन कॉलेज पुरातत्व विभागाचे संशोधक डॉ. सचिन जोशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मंगेश नवघने यांना सापडलेले कातळशिल्प किंवा कातळ कलाकृती जी आहे ती २५० ते ३०० वर्षापूर्वीची असण्याची शक्यता आहे. त्यावर शिवलिंग कोरलेले दिसत आहे. काही लोकांनी इतर ठिकाणी सापडलेल्या अशा शिल्पांना उगाचच नवाश्मयुगापर्यंत नेलं आहे पण त्याला अर्थ नाही. नवाश्म युगात देव ही कल्पनाच नव्हती तर कोणी शिवलिंग वगैरे का काढेल. ही सापडलेली शिल्प बराच वेळा धार्मिक ठिकाणी किंवा मंदिरांच्या अवतीभवती दिसतात, डोंगरावरती आढळून येतात. या शिल्पांमध्ये दिसत असलेले ठिपके म्हणजे त्यावेळी खेळले जाणारे खेळ आहेत. ही शिल्प स्थानिक लोकांनी केलेली असली तरी ती त्याच्या आकारावरून कलाकृतीवरून २५० ते ३०० वर्षांपूर्वीची असण्याची शक्यता आहे.



जोशी म्हणाले, नवघने यांना जशी कातळ शिल्प मिळाली आहेत तशीच जुन्नर, नारायणगाव, आंबेगाव या परिसरात देखील आढळून येतात. कोकणात असणारी कातळ शिल्प आणि या ठिकाणी असणारी शिल्प ही संपूर्ण वेगळ्या प्रकारची आहेत. कोकणातील शिल्पावर, प्राणी माणसं यांच्या आकृत्या दिसून येतात. सह्याद्रीत आढळणारा बेसॉल्ट नावाचा दगड त्याचं वैशिष्ट्य म्हणजे या काळया दगडावर काही करायचं म्हटलं तर त्याला लोखंडासारख्याच वस्तू वापराव्या लागतात. कोकणामधील कातळ शिल्प ही जांबा दगडावरती कोरलेली आहेत आणि हा जांबा दगड सॉफ्ट असतो. आपल्याकडच्या काळया दगडावर दगडांच्या हत्यारांनी काही करता येऊ शकत नाही म्हणूनच ही शिल्प अश्मयुगातील नाहीत हे मात्र नक्की.









