
कोथरूड : कोथरूड मधील पौड रस्त्यावर गुजरात कॉलनी येथील सिग्नलजवळ भरधाव कारची धडक बसल्याने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार दिनांक ११ मार्च रोजी घडली.
या अपघातात सुनंदा सावंत (वय ५५ रा. गुजरात कॉलनी कोथरूड पुणे) या महिलेचा मृत्यू झाला आहे. पौड रस्त्यावरील गुजरात कॉलनी सिग्नल चौकाजवळ एम एच १२ यु डब्ल्यू ९२१३ या क्रमांकाची कार वनाज कडून पौड फाट्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी सुनंदा सावंत या रस्ता ओलांडत होत्या. या कारची त्यांना जोरदार धडक बसली.

जखमी सावंत यांना ससून रुग्णालयात हलवण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघातानंतर महिलेस कोणी नातेवाईक नसल्याने पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून कार चालक तुकाराम बनसोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी दिली.
कारचा वेग जोरात होता. धडक बसल्यानंतर संबधित महिला रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी वर्तवली.









