छत्रपती शिवाजी महाराजांनी त्रुटी शून्य शासन व्यवस्था निर्माण केली : पराग ठाकूर

वारजेत शब्दब्रम्ह व्याख्यानमालेला सुरुवात
वारजे : त्रुटी शून्य शासन निर्माण करणारा राजा कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. असा राजा फार वर्षांनी एखाद्या देशाला मिळतो. अशा महाराजांचे गुण आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकतो का हा विचार करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असल्याचे मत शी. प्र. मंडळी पुणेचे नियामक मंडळ सदस्य पराग ठाकूर यांनी व्यक्त केले.
पुणे महापालिका , मराठी भाषा संवर्धन समिती, वारजे साहित्यिक कट्टा आयोजित शब्दब्रम्ह व्याख्यानमालेतील पहिल्या दिवशी पराग ठाकूर यांचे छत्रपती शिवरायांची आर्थिक, सामाजिक, राजकीय निती या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मेघवर्षा सोसायटीचे अध्यक्ष हेमंत दीक्षित, तसेच कार्यक्रमाचे संयोजक विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक बाबा धुमाळ उपस्थित होते.

ठाकूर म्हणाले, शिवाजी महाराज प्रत्येक वेळी एक एका संकटातून सुटत होते. त्या त्यावेळी ती प्रसूती वेदना माता जिजाऊंना सहन करावी लागत होती. त्यामुळे असे शिवाजी महाराज घडवणं ही सोपी गोष्ट नाही. ३५० वर्षानंतर सुद्धा आपण या राजाची आठवण रोज काढत असतो. शिवाजी महाराज म्हंटल की त्यांचे पराक्रमाचे धाडसाचे प्रसंग डोळ्यासमोर येतात. या पराक्रमातून त्यांचे शौर्य अतुलनीय साहस असे विषय आपल्या समोर येतात.



शिवाजी महाराजांचं एक तत्व होत शासन हे चालवायचं असतं त्याकडे पाठ फिरवून चालत नाही. कोणतीही अनुकूलता नसताना त्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांचं महत्त्व आहे. युद्ध हे केवळ करायचं नाही तर ते जिंकण्यासाठी लढायच हे सांगणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवजीराजा . महाराजांनी अतिशय कमी सैन्य असताना अत्यंत मोठ्या सैनिकांवर विजय मिळवल्याची अनेक उदाहरणं आहेत. गनिमी काव्याला मी शिवकावा म्हणेल कारण गनिमी काव्यासारखं सहाय्य इतर कोणत्याही राजाने घतेलेल नाही असे ठाकूर म्हणाले.
ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या सह्याद्रीच्या पर्वतावर ३६० दुर्ग बांधून त्या द्वारे लढण्याचं काम जे शिवाजी महाराजांनी केलं हे त्या पूर्वीच्या कुठल्याही राजाला सुचलं नाही. या डोंगराळ भागाचा शासन व्यवस्थेसाठी असा उपयोग या पूर्वी कुठल्याही राजाने केला नाही. त्रुटी शून्य शासन अर्थव्यवस्था त्यांनी निर्माण केली. संपर्कातून समाज घडवला. जे जे संपर्कात आले त्यांच्या पाठीवर हात ठेवला. ती माणस स्वराज्याच्या कामासाठी खस्त व्हायला सुद्धा तयार झाली. स्वराज्य निर्माण करताना जीव द्यायला तयार असणारी लोकं त्यांनी निर्माण केली. महाराजांनी संपर्कातून अशी माणसं तयार केली. हीच शिवाजी महाराजांची निती होती.



व्हीएतनाम सारख्या छोट्या राष्ट्रान अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राशी १४ वर्ष युद्ध केलं आणि व्हीएतनामने आमेरिकेला पराभूत केलं. हे केल्यानंतर तिथला जो राष्ट्राध्यक्ष होचीन मिन होता त्याला लोकांनी विचारल यामागची प्रेरणा तुमची नेमकी कोणती होती. तर तो सांगतो भारतामध्ये महाराष्ट्र नावाचं ठिकाण आहे. आणि तिथे असलेले छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांचा जो गनिमी कावा आहे तोच आम्ही वापरला आणि अमेरिकेला पराभूत केलं. आमची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराज होते.
महाराजांची सामाजिक निती पहिली तर स्वराज्य निर्माण करत असताना स्वराज्याची संकल्पना त्यांनी सर्वांना समजून सांगितली. महाराजांनी हे स्वराज्य माझ आहे हे कधीच म्हंटल नाही हे तर रयतेच स्वराज्य आहे असे ते कायम म्हणत त्यांची ही एक सामाजिक निती आपल्याला दिसते. यावेळी ठाकूर यांनी अनेक उदाहरणातून छत्रपती शिवाजी महाराजांची आर्थिक, सामाजिक, राजकीय निती समजावून सांगितली. प्रास्ताविक डी.के. जोशी यांनी केले. सूत्रसंचालन अतुल घटवाई यांनी तर आभार महादेव गायकवाड यांनी मानले.
या तीन दिवसीय व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी १३ मार्च रोजी लेखिका सुनीता राजे पवार यांचे स्त्री : काल, आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान होणार आहे तर तिसऱ्या दिवशी गुरुवार १४ मार्च रोजी विनोदाच्या गावा : मराठी साहित्यातील विनोद परंपरा या विषयावर लेखक, समीक्षक, गायक, डॉ. आशुतोष जावडेकर यांचे व्याख्यान होणार आहे. याच दिवशी माय मराठी साहित्य पुरस्काराने कवयित्री आसावरी काकडे व सिद्धीविनायक महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेश त्रिभुवन यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे आयोजक बाबा धुमाळ यांनी सांगितले.






