पुणे शहर

पुणे स्मार्ट सिटीच्या कामाबाबत अजित पवार यांनी दिल्या या सूचना

पुणे स्मार्ट सिटी ॲडव्हायजरी फोरमची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पुणे : पुणे शहरात ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत सुरु असलेली कामे शहराच्या सुविधा, सौंदर्य, वैभवात भर घालणारी असली पाहिजेत. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. कामात पारदर्शकता असली पाहिजे. निधीचा योग्य उपयोग झाला पाहिजे. लोकप्रतिनिधींच्या व ‘स्मार्ट सिटी’ मिशनच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन ‘स्मार्ट सिटी’ संदर्भातील पुणे शहराचे राष्ट्रीय रँकिंग सुधारण्याचा प्रयत्न व्हावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कोर्पोरेशन लिमिटेड’च्या ‘स्मार्टसिटी ॲडव्हायजरी फोरम’ची पाचवी बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यातील विधानभवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. बैठकीला खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे,  सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, अॅडव्हायजरी फोरमचे सदस्य सतीश मगर, अनिरुद्ध देशपांडे तसेच अन्य पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  प्रकल्प राबविताना लोकप्रतिनिधी व अनुभवी तज्ञांच्या सूचना विचारात घेऊन ‘स्मार्ट सिटी मिशन’ च्या मार्गदर्शक तत्वानुसार कामे  करुन घ्यावीत.  कामात पारदर्शकता ठेवून कोणतीही कसर राहणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना करुन विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समन्वय ठेवून सुरु असणारी कामे लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावीत, असेही त्यांनी सांगितले.

खासदार गिरीश बापट यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पासंदर्भात अनेक उपयुक्त सूचना केल्या. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्मार्टसिटी अंतर्गत सुरु असणाऱ्या कामांचे सादरीकरण करुन माहिती दिली.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये