कोथरूड येथील चांदणी चौक दिगंबर जैन मंदिरात महावीर निर्वाण कल्याणक महोत्सव संपन्न..

विविध धार्मिक, दीपोत्सव व दिवाळी फराळ कार्यक्रमांचे आयोजन
कोथरुड : कोथरूड मधील चांदणी चौकातील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांचा २५५० वा मोक्ष/निर्वाण कल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जैन मंदिराला नेत्र दीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीर यांचा अभिषेक तसेच महा शांतीधारा करण्यात आली. त्यानंतर भगवान महावीर यांचे पूजन, अष्टक, महावीराष्टक, स्तोत्र, निर्वाणकांड म्हणून जैन समाजातील सर्वांनी निर्वाण लाडू चढवला.

यानंतर भगवान महावीर यांची महामंगल आरती करण्यात आली. त्यानंतर भगवान महावीर यांची प्रतिमा व जिनवाणी घेऊन जैन श्रावकांनी मंदिर परिक्रमा करत “महावीर मोक्षा गेले जयदेव बोला आंनद झाला”चा जयघोष करून मोठ्या आनंदाने मोक्ष निर्वाण कल्याणक महोत्सव संपन्न झाला
यावेळी सर्वांसाठी दिवाळी स्नेह मिलन व फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चंद्रकांत मोकाटे, भीमराव तापकीर, पृथ्वीराज सुतार, सचिन दोडके, मयुरेश वांजळे, राजेंद्र मराठे आदी मान्यवर सहभागी झाले होते.



सायंकाळी महादीपोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर महामंगल आरती संपन्न झाली. या सर्व कार्यक्रमांमध्ये कोथरूड, पौड रोड, वारजे, बावधन, बाणेर इत्यादी भागातील दिगंबर जैन समाजातील बहुसंख्य जैन बांधव सहभागी झाले होते. या निर्वाण कल्याण महोत्सवाचे आयोजन भगवान महावीर मंडळ व श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराचे विश्वस्त कमिटी यांनी केले होते. यावेळी विश्वस्त मोहन कुडचे, श्रीकांत पाटील, उदय लेंगडे, शिरीष बोरगावे, अजित शेट्टी, रमेशभाई शहा, प्रीतम मेहता, सुनील बिरनाळे, शोभा पोकळे, अशोक मगदूम, प्रकाश कुडचे आदि कमिटी विश्वस्त तसेच प्रणय मेहता, सागर पंडित हुक्केरी उपस्थित होते.






