मेट्रो प्रकल्पबाधित झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेल- आमदार शिरोळे

पुणे : मेट्रो प्रकल्पबाधित झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावा आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा द्या अशा सूचना उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
शिवाजीनगर-कामगार पुतळा आणि राजीव गांधी नगर येथील झोपडीधारक मेट्रो प्रकल्प – १, २, ३ मुळे बाधित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात झोपडीधारकांना प्रकल्पाची माहिती देण्यात आली आणि त्यांना विश्वासात घेऊनच पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला जाईल आशी ग्वाही पालकमंत्र्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही दिली.
या बैठकीला महपौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरव राव, महा मेट्रोचे डॉ.रामनाथ, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त डॉ. अमिताभ गुप्ता, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, तसेच झोपडपट्टीधारकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.













