मतदारयाद्यांसाठी नोंदणी करा, पैसे भरा; राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी

पुणे : क्षेत्रीय कार्यालयात मतदारयाद्या अद्यापही मिळत नसल्याचे चित्र असून, याद्यांची मागणी केल्यानंतर महापालिका प्रशासन आधी नोंदणी करा, मग याद्या आल्यानंतर कळवू, असे उत्तर देत असल्याच्या तक्रारी राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
प्रारूप मतदारयादीवर सुमारे ६५ हजार हरकती नोंदविण्यात आल्या. यापैकी ४५ हजार हरकतींची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने अंतिम मतदारयादी तयार केली आहे.

याद्या आणण्यासाठी इच्छुक महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात गेल्यानंतर त्यांच्या पदरी निराशा पडत आहे. मतदारयाद्यांची नोंदणी करा त्यानंतर याद्या न्या, अशी उत्तरे महापालिका अधिकारी देत असल्याचे राजकीय पक्षांचे पदाधिकारी सांगत आहेत.
याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे म्हणाले, महापालिकेने प्रभागांच्या मतदारयाद्या प्रिंट केलेल्या आहेत. राजकीय पक्षांच्या मागणीनुसार दिल्या जात आहेत. काही याद्या कमी असल्याने नोंदणीनुसार मतदारयाद्या दिल्या जात आहेत. इच्छुकांनी नोंदणी केल्यानंतर महापालिकेतील कर्मचारी संबंधितांना दूरध्वनी करून याद्या देण्याची व्यवस्था करतात.






