महविकास आघाडीचा शेतकऱ्यांना दिलासा

शेतकऱ्यांना 2 हजार 289 कोटी रुपयांची मदतीचे वाटप
नागपूर : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश आज काढण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल असे जाहीर केले होते.
आज निवडणूक आयोगाने पत्र पाठवून मदत वाटपाबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जो 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे, त्यापैकी आज 2 हजार 289 कोटी वितरित करण्यात आले आहेत. हा सर्व निधी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यासाठीच द्यावा अशी सूचना दिली आहे, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

या 4 हजार 700 कोटींपैकी आज 2 हजार 289 कोटी वाटप केले जाणार आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या असा रोजच गळा काढणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी केंद्राकडे अतिरिक्त मदतीसाठी किमान साधं पत्र तरी लिहावं, असा टोलाही त्यांनी लगावला. आज जे 2 हजार 289 कोटी रुपये सरकार देत आहे, ते जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा होतील. त्यानंतर ते बँकांकडे जाईल. बँकांना शेतकऱ्यांच्या याद्या तयार ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे पुढील 2 ते 3 दिवसात ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.






