काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन

पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे माजी शिक्षण मंत्री अनंतराव थोपटे ( वय 93) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेले महिनाभर त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते.
आज सायंकाळी 7:30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती समोर येत आहे.
अनंतराव थोपटे यांनी भोर विधानसभा मतदारसंघातून सलग अनेक वेळा विजय मिळवून त्यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला निर्माण केला होता. त्यांनी राज्य मंत्रिमंडळात सुमारे 14 वर्षे विविध खात्यांचे मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पुणे जिल्ह्यात दीर्घकाळ “भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजे भोर” अशी राजकीय ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने या भागात मजबूत संघटन उभी केली.

त्यांचे पुत्र संग्राम थोपटे यांनी 2009, 2014 आणि 2019 मध्ये भोर मतदारसंघातून विजय मिळवत वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेला होता. मात्र विधानसभा निवडणूक 2024 नंतर संग्राम थोपटे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
राजकीय कारकीर्द
1980 ते 1999 या काळात त्यांनी भोर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
2004 मध्ये त्यांनी पुन्हा भोर मतदारसंघ जिंकून विधानसभेत पुनरागमन केले.
महाराष्ट्रातील विविध काँग्रेस सरकारांमध्ये त्यांनी सुमारे 14 वर्षे मंत्री म्हणून काम केले.
शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित धोरणांमध्ये भूमिका बजावली.



