मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्री भीषण अपघात; पुण्यातील युवा नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू

पुणे : पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, तुषार भूमकर हे आपल्या फॉर्च्युनर गाडीने पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. बोगद्यातून जात असताना त्यांच्या वाहनाने पुढे चाललेल्या मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, भूमकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.या गाडीत प्रवास करणारे इतर 3 ते 4 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील एकाची तब्येत चिंताजनक असून त्याला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, तर उर्वरित तिघे किरकोळ दुखापतींसह सुखरूप बचावले आहेत.

अपघाताची घटना घडल्याचे समजताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली तसेच जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली. भूमकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलिसांनी या प्रकरणाची रीतसर नोंद केली आहे. अपघातामुळे बोगद्यात काही काळ वाहनांची मोठी रांग लागली होती.
तुषार भूमकर हे वाकड व पिंपरी-चिंचवड परिसरात सामाजिक व राजकीय कामांमध्ये नेहमी अग्रभागी असायचे. त्यांच्या पत्नीने यापूर्वी काँग्रेस पक्षाकडून महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्यांच्या अचानक जाण्याने वाकड परिसरावर शोककळा पसरली असून विविध स्तरातून दुःखावेग व्यक्त केला जात आहे



