पुणे महापालिकेकडून आशा वर्कर्सना मिळणार सानुग्रह अनुदान

सीटू प्रणीत आशा वर्कर्स युनियनला यश! स्थायी समितीमध्ये ठराव मंजूर
पुणे : महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पुणे महानगरपालिकेत कार्यरत आशा वर्कर यांना १०,००० रुपये दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. गेले काही दिवस या विषयाचा पाठपुरावा करणाऱ्या सी.आय.टी.यु. सलग्न आशा वर्कर्स युनियन (पुणे जिल्हा) यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

महापालिकेसाठी काम करणाऱ्या रोजंदारी – कंत्राटी कामगार यांना रु. १० हजार सानुग्रह अनुदान बोनस देण्याचा निर्णय गेल्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला होता. परंतु आशा वर्कर यांना हा लाभ मिळाला नव्हता. त्यासुद्धा मनपाला सेवा देत असून त्यांच्याशी भेदभाव करू नये, असे आवाहन युनियन मार्फत करण्यात आले होते. त्यास सर्व नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
पुणे मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले आणि सदस्य सुहास टिंगरे सर्व पक्षीय सदस्यांनी या मागणीला पाठिंबा देऊन ठराव मंजूर केला. त्याबद्दल युनियनने त्यांचे आभार मानले आहेत. आशा वर्कर यांची दिवाळी देखील “गोड” होणार आहे, याबद्दल तमाम अशा वर्कर्सने आनंद व्यक्त केला आहे. संघटनेचे अध्यक्ष वसंत पवार, सचिव किरण मोघे तसेच आशा वर्कर्स युनियन पुणे जिल्हा (सी.टू.)अध्यक्ष अजित अभ्यंकर यांनी आशा वर्कर दिवाळी बोनस या महत्त्वपूर्ण विषयासाठी पाठपुरावा केला होता.



