केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाचा आनंद सेवाकार्यातून… दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मंदार बलकवडे मित्र परिवाराचा माणुसकीचा हात !

पुणे : वाढदिवस म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि शुभेच्छांचा सोहळा; मात्र हाच आनंद समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आणि संकटात सापडलेल्यांना आधार देण्यासाठी खर्ची पडला, तर त्या वाढदिवसाचे महत्त्व अधिकच वाढते. याच सामाजिक जाणीवेचा प्रत्यय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवाभावी उपक्रमांतून आला. केवळ शुभेच्छांचा वर्षाव न करता समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत मंदार बलकवडे मित्र परिवार, देशप्रेमी मित्र मंडळ आणि ढोलताशा महासंघ पुणे शहर यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप, चाऱ्याअभावी अडचणीत आलेल्या दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी एक ट्रक चारा तसेच ऊन-पावसात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी वॉटर बॉटलचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांच्या माध्यमातून माणुसकीचा ओलावा जपण्याचा आणि समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला.. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते.



या प्रसंगी मंदार बलकवडे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सुपूर्द केला. दुष्काळाच्या संकटामुळे अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. अशा कठीण परिस्थितीत मदतीचा हात पुढे करून गरजूंच्या पाठीशी उभे राहण्याचा सामाजिक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.



यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “या उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंच्या मदतीसाठी पुढे आलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक कौतुक आणि हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल विशेष आभार! जन्मदिवसाचा आनंद अशा विधायक आणि समाजोपयोगी कार्यातून साजरा होणे, ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. समाजातील गरजू घटकांना मदत करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिले, तर संकटाच्या काळात अनेकांना मोठा आधार मिळू शकतो.”



विशेष म्हणजे, देशप्रेमी मित्र मंडळाचे कार्यकर्ते मंदार बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखालील आपत्तीच्या काळात नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी धावून जात आले आहेत. सामाजिक बांधिलकी केवळ शब्दांत न ठेवता ती कृतीतून सिद्ध करण्याची परंपरा मंडळाने सातत्याने जपली आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा वाढदिवस पुणे शहरात सामाजिक उपक्रमातून साजरा होत असताना आणि दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी केलेल्या अहवानाला प्रतिसाद देत मंडळाने दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत पुन्हा एकदा सामाजिक दायित्व दाखवत आपले कर्तव्य पार पाडले आहे.



एका बाजूला दुष्काळामुळे अन्नधान्य आणि चाऱ्याचा प्रश्न भेडसावणारी कुटुंबे, तर दुसऱ्या बाजूला आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अहोरात्र सेवा देणारे पोलीस बांधव… अशा विविध घटकांची गरज ओळखून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांनी वाढदिवसाच्या सोहळ्याला सामाजिक सेवेची अर्थपूर्ण जोड दिली.






या वेळी देशप्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक विश्वकर्मा, ढोलताशा महासंघ पुणे शहर अध्यक्ष अक्षय बलकवडे, ॲड. शिरीष थिटे, नगरसेवक सुनीलजी पांडे, नगरसेविका मिताली सावळेकर, माजी प्रभाग अध्यक्ष प्राची बगाटे, प्रशांत हरसुले, मंगेश खराटे, वैभव जमदाडे, अनघा जगताप, पूनम चव्हाण, सुवर्णा काकडे, मामा फाले, दीपक काका ढेंबे, मोहन मामा शिगवण, दत्तात्रय काका मते, रूपेश कदम, सतीश दिघे, प्रणव गरूडकर, साजिद तांबोळी, गणेश केसवड, विजयभाऊ केंडे यांच्यासह देशप्रेमी मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



वाढदिवसाच्या निमित्ताने मिळणाऱ्या शुभेच्छांपेक्षा एखाद्या गरजूच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधानाचे हास्य अधिक मोलाचे असते. संकटात सापडलेल्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या दुःखात सहभागी होणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून मंदार बलकवडे आणि देशप्रेमी मित्र मंडळाने माणुसकीचा हाच संदेश अधोरेखित केला.

























































