प्रसिध्द अभिनेत्री व शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर ऊद्या पुण्यात

व्याख्याने; महिला, युवा नेत्यांच्या मुलाखती, प्रबोधनकारांच्या साहित्याचे अभिवाचन..
पुणे : ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणेतर्फे प्रबोधन महोत्सवात व्याख्यान, राजकीय क्षेत्रातील महिलांच्या तसेच युवा नेत्यांच्या मुलाखती, प्रबोधनकार लिखित आणि संपादित साहित्याचे अभिवाचन तसेच छायाचित्र-व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रबोधनकारांची ध्वनिमुद्रीत भाषणेही ऐकावयास मिळणार असून या कार्यक्रमांतून प्रबोधनकारांच्या विचारांचा जागर होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रसिध्द अभिनेत्री व शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हा महोत्सव दि. 20 ते 26 जानेवारी 2021 या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केला असून या निमित्ताने साहित्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध विचारधारांची दिग्गज मंडळी एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोर्हे यांनी आज (दि. 18 जानेवारी 2021) पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार हरिष केंची, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे, सचिन इटकर, किरण साळी उपस्थित होते.






