सरकारने एल्गार परिषदेला अचानक परवानगी का दिली; ब्राह्मण महासंघाचा सवाल

पुणे : राज्य सरकारने येत्या 30 जानेवारीला पुण्यात एल्गार परिषद घेण्यास परवानगी दिल्यानंतर आता राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. महाविकासआघाडी सरकारच्या या निर्णयावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप नोंदवला आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत 1 जानेवारीला एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, आता सरकारने 30 जानेवारीला एल्गार परिषदेसाठी परवानगी दिली आहे. एका महिन्यात परिस्थितीत असा काय फरक पडला की, सरकारने एल्गार परिषदेला परवानगी दिली, असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला. (Why the government suddenly allowed the Elgar Parishad ; Question of Brahmin Federation)
एल्गार परिषदेसाठी कोण वक्ते येणार, या परिषदेचा उद्देश आणि निमित्त काय, हे कोणालाच माहिती नाही. किंबहुना या परिषदेला परवानगी देण्याची गरजही नव्हती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला पण मान्य आहे. परंतु त्या नावाखाली स्वैराचार होऊ नये एवढीच आमची इच्छा असल्याचे आनंद दवे यांनी स्पष्ट केले.

सरकार काय खबरदारी घेणार?
एल्गार परिषदेच्यावेळी स्थानिक प्रशासन आणि सरकार काय खबरदारी घेणार, हे एकदा स्पष्ट करावे. या परिषदेतील भाषणं रेकॉर्ड करून त्यांचा अभ्यास केला जाणार आहे का? तसेच एल्गार परिषदेच्या आयोजकांना योग्य समज आणि निर्बंधांची जाणीव करून देण्यात यावी. आम्ही एल्गार परिषदेचे आयोजक बी.जी.कोळसे पाटील यांनाही भेटून मागण्यांचे एक पत्र देणार असल्याची माहिती आनंद दवे यांनी दिली.
कधी आणि कुठे होणार एल्गार परिषद?
गेल्या अनेक दिवसांपासून माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील एल्गार परिषदेला परवानगी मिळावी म्हणून झटत होते. अखेर पुणे पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे. ही परिषद येत्या शनिवारी (30 तारखेला) स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे.



