पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला पुणेकरांच्या जीवाची पर्वा दिसत नाही : दिपाली धुमाळ

पुणे : पुणे शहरात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. उपचार घेत असलेल्या काही गंभीर परिस्थिती असलेल्या कोरोना रुग्णांना रेमडीसेवर इंजेक्शनची गरज भासत असून हे इंजेक्शन मिळवताना रुग्णांच्या नातेवाइकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, तसेच रुग्णांना बेड मिळत नाहीत, लसीकरण केंद्रावर वेळेवर लस मिळत नाही, त्यामुळे यातून महापालिकेतील सत्ताधारी भाजपचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांचा व प्रशासनाचा समन्वय नसल्यानेच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचा घणघणाती आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. The ruling BJP in Pune Municipal Corporation does not care about the lives of Punekars: Deepali Dhumal
कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना देखील सत्ताधारी भाजपने व पालिका प्रशासनाने लवकर योग्य ती पावले उचलली नसल्याने आजची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना पुणेकरांच्या जीवाची पर्वा आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. रुग्ण संख्या वाढत असताना आम्ही प्रत्येक भागात करोना केअर सेंटर चालू करावे यासाठी मागणी करत होतो पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज कोरोना रुग्णांना ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला असून रुग्णालयांमध्ये बेड मिळवण्यासाठी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत असल्याचे दिसून येत आहे. एवढी गंभीर परिस्थिती असताना देखील सत्ताधारी भाजप निष्ठूरपणे वागत असल्याची टीका धुमाळ यांनी केली आहे.
लसीकरण केंद्र चालू करण्यात आली असली तरी बऱ्याच केंद्रांवर वेळेवर लस मिळत नसल्याने नागरिकांना दोन दोन तास ताटकळत बसावे लागत आहे. महापालिका रुग्णालय व लसीकरण केंद्रावर ही पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना व रुग्णांना योग्य त्या सेवा सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे सत्ताधारी भाजप पक्षातील महापालिकेतील पदाधिकारी नक्की कसले नियोजन करत आहेत असा प्रश्न धुमाळ यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना रुग्णांना योग्य उपचार व सेवा मिळाव्यात यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना घेऊन नियोजनाची बैठक घेण्यात यावी म्हणून आम्ही वारंवार मागणी करत आहोत, पण विरोधकांच्या प्रश्नांना द्यायला उत्तरे नसल्याने ही बैठक घेतली जात नसून मनमानी कारभार करून आज शहराची परिस्थिती हाताबाहेर घालवल्याचा गंभीर आरोप धुमाळ यांनी केला आहे.

कोरोना रुग्णांना उपचार देण्यासाठी योग्य ते नियोजन करा, बेड उपलब्ध करून द्या, रेमडीसेवर इंजेक्शन वेळेत व माफक दरात किंवा मोफत उपलब्ध करून द्या, अन्यथा पुणेकर तुम्हाला माफ करणार नाहीत असा इशारा दिपाली धुमाळ यांनी महापालिकेतील सत्ताधारी भाजप पक्षाला दिला आहे.



