पुणे शहर

ठेकेदार आधी ठरवायचा मग टेंडर काढायचे हा पुणे पालिकेतील भाजपचा नवा पायंडा बंद करा ; दिपाली धुमाळ यांचे अजित पवार यांना पत्र..

पुणे : पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप पक्षाला पुणेकर पुन्हा सत्ता देणार नाहीत याची खात्री झाली असल्याने पुणे महानगरपालिका प्रशासनावर दबाव आणून 5 ते 7 वर्षाचे टेंडर कालावधी घेण्यास अट्टहास केला जात असल्याची चर्चा सध्या महापालिका वर्तुळात जोरात सुरू आहे. त्यामुळे ठेकेदार आधी ठरवायचा मग टेंडर काढायचे हा सत्ताधारी भाजपा पुणे महापालिकेत पाडत असलेला पायंडा बंद करा, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. Close the BJP’s new foundation in Pune Municipal Corporation by deciding the contractor first and then issuing the tender

Img 20210516 094854

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या पत्रात धुमाळ यांनी पुणे महानगर पालिकेतील विविध टेंडर प्रक्रियेत कसा गैरप्रकार चालू आहे याबाबत माहिती दिली आहे.

१.निविदा क्र.१४/२०२१ पुणे महानगरपालिका अंतर्गत ड्रेनेज लाईन साफसफाई ४ नग १२ के एल क्षमतेचे सक्शन कम जेटिंग रिसायकलर मशिनच्या सहाय्याने सात वर्षाच्या कालावधी करिता करणे हे टेंडर मागविण्यात आले असून एकाच वेळी सात वर्षाचा कालावधीसाठी निविदा मागविली आहे. 

Img 20210521 wa0019

महानगरपालिका हद्दीतील ड्रेनेज लाईन व पावसाळी लाईन मधील गाळ काढायचे काम वर्षोनुवर्षे होत असून यावर्षी ७ वर्षाच्या कालावधीसाठी ३४ कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. या टेंडरच्या अटी व शर्ती पाहता ठेकेदार आधीच ठरला आहे, ठेकेदारांची माणसे सर्व नियम अटी शर्ती बनवून देतात आणि प्रशासन त्याला होकार देते असा नवीन पायंडा पुणे महानगरपालिकेत पडला जात आहे.

२.सुरक्षा विभागाने ३० कोटी रकमेचे टेंडर काढले असून यातून सुरक्षा रक्षक पुरविणे हे काम होणार आहे. या टेंडरच्या अटी बघितल्या असता भाजपच्या आमदारांशी संबंधित कंपन्या यामध्ये पात्र होणार आहेत. अद्याप मनपा मिळकती कधी उघडणार याची शाश्वती नाही त्यामुळे याचा विचार करणे गरजेचे आहे. 

३.महापालिकेस उत्पन्न मिळावे या हेतूने रस्ते खोदाईस परवानगी द्यायची आणि परवानगी चे ठिकाण सोडून शहरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर केबल्स टाकायच्या असा प्रकार सध्या शहरात जोरात चालू आहे.

४.पुणे शहरातील नदीतील जलपर्णी काढणेबाबत टेंडर प्रक्रिया राबविली असून हे काम विशिष्ट ठेकेदारास मिळावे या हेतूनेच बनविले आहे अशा कारभारामुळे निकोप स्पर्धा होत नाही. 

५. पुणे महानगरपालिकेचे ३० वाहनतळ चालविण्यास देण्याचे टेंडर काढले असून हा प्रकार म्हणजे ठेकेदारासाठीच काम करायचे भाजपने ठरवले आहे असे  म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असताना मागील एक वर्षांपासून वाहनतळ सुरळीत चालू नसताना असे टेंडर काढले जात आहे. पूर्वी एक एक वाहनतळाचे टेंडर काढले जायचे अचानक हा बदल का केला यावर कोणीही अधिकारी बोलायला तयार नाही.  हे काम भाजपशी जवळीक असलेला ठेकेदारच घेईल यात शंका नाही.

अशा विविध टेंडरच्या माध्यमातून पुणेकरांच्या कररूपी पैशाची धुळदान उडविली जात असून कोरोनाच्या काळात गोंधळ घालू, नंतर आपली सत्ता नाही, आपण कशासही उत्तरदायित्व नाही, अश्या भावनेने पुणे महानगरपालिकेत गैरव्यवहार चालू असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे. याचा फायदा प्रशासनातील काही अधिकारी उचलत असून काही अधिकारी खाजगीत याबाबत बोलत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जास्तीत जास्त कामे पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाला केराची टोपली दाखविली गेली आहे. कोरोनाची परिस्थिती बघता लसीकरण हा एकमेव मार्ग दिसत असताना लस खरेदी साठी राज्य शासनाकडे बोट दाखविणारे भाजपचे सत्ताधाऱ्यांचे पितळ या प्रकारांमुळे उघडे पडले आहे.

मुंबई महानगरपालिकेने लसीचे टेंडर मागविले असून त्यामध्ये सहभागी कंपन्यांना संपर्क करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम६७ (३)(क) चा वापर करून लस खरेदी करावी अशी मागणी आम्ही पुणे महानगरपालिकेकडे केली आहे. तसेच शहरात म्युकर मायकोसिस या आजाराचे रुग्ण आढळून येत असताना अशा गंभीर विषयांवर नियोजन करणे सोडून पुणे महानगरपालिका प्रशासनावर दबाव आणून खालील टेंडर प्रक्रिया राबवून भाजपचे सत्ताधारी एकहाती सत्तेचे ऋण फेडत असल्याची टीका धुमाळ यांनी केली आहे.

कोरोनावर होणारा खर्च पाहता महापालिकेकडून वित्तीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. असे असताना महापालिकेची लूट थांबवणे सोडाच पण पुढील अनेक वर्षांमध्ये मनपा तिजोरीत कसा खडखडाट होईल याचे नियोजन लॉक डाउन काळात चालू आहे.

त्यामुळे वरील बाबींचा विचार करून महापालिकेचे होणारे आर्थिक नुकसान बघता या पत्राच्या अनुषंगाने सर्व वादग्रस्त टेंडर स्थगित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त यांना द्यावेत अशी मागणी धुमाळ यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये