पुणे शहर

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरु होईपर्यंत संघर्ष चालूच राहील – खासदार गिरीश बापट

पुणे – शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोच्या तिसऱ्या मार्गाचे काम प्रत्यक्ष चालू होईपर्यंत आंदोलन चालूच राहील, असा इशारा खासदार गिरीश बापट यांनी आज (शुक्रवारी) दिला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरु करण्याच्या मागणीसाठी औंध येथील ब्रेमेन चौकात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आमदार सिद्धार्थ शिरोळे, उपमहापौर सुनीता वाडेकर, भाजपचे शहर प्रभारी राजेश पांडे, सुनील माने, नगरसेवक आदित्य माळवे, नगरसेवक राजेश येनपुरे, माजी महापौर दत्ता गायकवाड, दत्ताभाऊ खाडे, रवींद्र साळेगावकर, प्रतुल जागडे आदी सहभागी झाले होते.

Img 20211105 wa0169

शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे काम सुरु करण्यासाठीच्या सर्व कामांची पूर्तता झालेली आहे. ९८ टक्के जमिनीचे संपादनही झालेले आहे. केंद्र सरकारकडून सर्व ती मदत मिळत असूनही काम सुरु का करण्यात येत नाही? असा सवाल खासदार गिरीश बापट यांनी केला. गेल्या आठवड्यात पीएमआरडीएच्या प्रशासनाला पक्षातर्फे निवेदन देऊन आठ दिवसांत काम सुरु करावे अशी मागणी केली होती. या आठ दिवसांत प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नसल्याने आज आंदोलन करण्यात आले आणि हे काम प्रत्यक्षात सुरु होईपर्यंत विविध मार्गाने आंदोलन केले जाईल, असा इशारा खासदार बापट यांनी दिला.

शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो कामाबाबत प्रशासनात गांभीर्यच दिसत नाही, असा आरोप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला. विद्यापीठ चौकातील वाहतुकीची कोंडी दूर व्हावी याकरिता मेट्रोचे काम गतीने सुरू होणे गरजेचे आहे. विद्यापीठातील उड्डाणपूल, तिसरा मेट्रो मार्ग याकरिता खासदार गिरीश बापट यांच्या सूचनेवरून भाजपने संपूर्ण सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. पुढच्या २५, ३० वर्षाच्या नियोजनाच्या आराखड्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे आणि राज्य सरकार मात्र हे काम अडवतय हे निषेधार्ह आहे. लाखो लोकांच्या सोयीसाठी मेट्रोचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी खासदार बापट संघर्ष करीत आहेत. माझ्यासह शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी आणि भाजपचे कार्यकर्ते बापट यांच्या पाठीशी उभे आहोत आणि पुढेही उभे राहतील, अशी ग्वाही आमदार शिरोळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये