पुणे शहर

ऍसिड प्यायल्याने जठराचे आउटलेट ब्लॉक झालेल्या दोन वर्षांच्या मुलावर ससूनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

पुणे : pune आर्यन सुनिल थोरवे हा जेमतेम दोन वर्षांचा मुलगा. इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील रहिवाशी. चारचाकी गाडीच्या बॅटरीत भरण्यासाठी, घरात पाण्याच्या बॉटलमध्ये ठेवलेले ऍसिड चुकून प्यायला. सुरुवातीला जवळच्या हॉस्पीटलमध्ये ऍडमिट केले व जुजबी ट्रीटमेंट देवून घरी पाठवले. १५ दिवसांनी जेंव्हा बाळाला उलट्या होऊ लागल्या व पाणीही पचेनासे झाले, तेंव्हा मात्र आईवडीलांचे धाबेच दणाणले. बाळाचे वजनही दीड किलोने कमी झाल्याने, त्याला उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले. ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दुर्बिणीने तपासणी केली तेंव्हा, जठराचे आउटलेट पुर्णपणे ब्लॉक झाल्याचे निदान झाले. त्यातून सुईदेखील आरपार जात नव्हती. दुर्बिणीद्वारे पुढील उपचार करणे शक्य नव्हते व शस्त्रक्रियेचा खर्चही परवडणारा नव्हता. शेवटी शस्त्रक्रियेसाठी बाळ ससूनमध्ये लहान मुलांच्या शस्त्रक्रिया विभागात दाखल झाले. सुरुवातीला त्याला सलाईनवर ठेवण्यात आले. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने रक्तही चढवावे लागले. काही प्राथमिक चाचण्या झाल्यावर, त्याच्या हृद्याचे ठोके वयाच्या मानाने कमी वेगाने पडतात हे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्याअनुषंगाने, पुढील तपासण्या केल्यावर त्याच्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम व झिंक यांची खूपच कमतरता असल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी डॉ. आरती किणीकर यांच्या टीमने बाळावर आय.सी.यू. मध्ये उपचार केले.

बाळातील कमतरता काही अंशी दूर झाल्यावर, रुग्णालयातील बालशल्यविशारदांच्या टीमने बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. यात पेडियाट्रिक सर्जरी विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी नलबले – भोसले, डॉ. अमेर इक्बाल व डॉ. शीतल भैसारे यांचा समावेश होता. शस्त्रक्रियेसाठी बाळाला भूल देणेही खूपच जिकिरीचे होते. भूलतज्ज्ञ डॉ. संयोगिता नाईक, डॉ. सुषमा तांदळे व टीमने ही जबाबदारी यशस्वीपणे पेलली.

Img 20211105 wa0169

“शस्त्रक्रियेनंतर बाळाची तब्येत उत्तम असून सुरुवातीला नळीद्वारे व आता त्याला तोंडावाटे द्रवपदार्थ, तसेच घन आहारही चालू केला आहे. कुठलाही त्रास न होता आता तो तोंडाने अन्नपाणी घेत असल्याने पालकही सुखावले आहेत. वजनही एक किलोने वाढले आहे. ” असे बाळावर उपचार करणाऱ्या डॉ. मीनाक्षी नलबले – भोसले यांनी सांगितले.

” घरात ऍसिड ठेवणे, तसेच ते लहान मुलांच्या हाती लागेल अशा पद्धतीने साठवणे अतिशय चुकीचे आहे. चुकून ऍसिड प्यायल्याने घसा, अन्ननलिका तसेच जठराच्या गंभीर जखमा होऊ शकतात. बाळाला न्युमोनिया होऊ शकतो. तसेच ते लहान मुलांसाठी जीवघेणे ठरू शकते”. – डॉ. मीनाक्षी नलबले – भोसले

“ससूनमध्ये नव्याने स्थापन झालेल्या लहान मुलांच्या शस्त्रक्रिया विभागातील (पेडियाट्रिक सर्जरी) डॉक्टर्स मुलांवरील अतिशय किचकट व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करत आहेत. सदर अतिविशेषोपचार विभागासाठी अधिक चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.”. – डॉ. विनायक काळे, मा. अधिष्ठाता, बी.जे. मेडीकल कॉलेज, पुणे
अधिक माहितीसाठी / शंकानिरसनासाठी संपर्क : डॉ. मीनाक्षी भोसले

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये