हिंमत असेल तर राजीनामा द्या – अमित शहा यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान

पुणे : महाविकास आघाडीतील शिवसेनेसह तिन्ही पक्ष एकत्र आले तरी त्यांच्या विरोधात लढण्याची भाजपची आजही तयारी आहे. हिंमत असेल तर, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि मैदानात या ,असे आव्हान केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी आज येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना दिले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि पदिधिकाऱ्यांचा मेळावा गणेश कला क्रीडा केंद्र येथे झाला. मेळाव्याला तरुणांची गर्दी झाली होती याबद्दल अमित शहा यांनी समाधान व्यक्त केले आणि पुणे महापालिकेची निवडणूक भाजप दोन तृतीयांश जागा मिळवून जि़केल असा विश्वास व्यक्त केला. या भाषणात अमित शहा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचे निकम्मे सरकार असे वर्णन केले. डिलर, ब्रोकर आणि ट्रान्स्फरर असे हे ‘डिबीटी’ सरकार आहे, अशी टीका केली.

भाजप, शिवसेनेने विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढवायची आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली लढवायची, बहुमत मिळाल्यावर मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीसच होतील असेच ठरले होते याचा पुनरुच्चार अमित शहा यांनी केला. खुद्द शिवसेना उमेदवारांच्या प्रचारात आणि शिवसेना नेत्यांच्या प्रचारातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच फोटो लावलेले बॅनर झळकवले जात होते. मोदी, फडणवीस यांच्याच नावाचा प्रचार करुन मते मिळवली आणि निवडणूक निकालानंतर आपल्याला मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून भाजपशी विश्वासघात केला, असा आरोप अमित शहा यांनी यावेळी बोलताना केला. महाराष्ट्रातील तीन चाकांवर चाललेले हे सरकार तीन वेगवेगळ्या दिशांना जात होते, आता तर त्याची चाके पंक्चर झाली असून, केवळ धूर सोडत समाजात प्रदुषण वाढवत चाललं आहे. महाराष्ट्राला गतवैभव मिळवून देण्याचा स़ंकल्प भाजपच्या नेतृत्त्वाचा आहे, असेही शहा यांनी सांगितले.
शहा यांनी भाषणाची सुरुवात ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी केली आणि अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख करताना’जय श्रीराम’च्या घोषणा तीन वेळा दिल्या आणि उपस्थित कार्यकर्त्यांनाही द्यायला लावल्या.
मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलचे दर लिटरमागे १५ रुपयांनी कमी केले. देशातील भाजपशासित राज्ये आणि ओडिशातील नवीन पटनाईक सरकारनेही इंधनावरील कर कमी केले. पण, महाराष्ट्रात अजूनही पेट्रोल, डिझेलवरील कर कमी का होत नाहीत याचा जाब मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांना विचारा असे अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.



