महाराष्ट्र

माझ्या डॉक्टर बनण्याच्या प्रवासात एसटीचा मोठा वाटा : डॉ. सचिन नागापूरकर

एसटीने ग्रामीण भागात अनेक डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी घडवले.

आज गेले साधारणपणे 2 महिने कालावधी झाला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आजतरी कोणताही निर्णय झालेला नाही. संपकरी आणि सरकार चर्चासत्र सुरूच आहे पण यश आलेले नाही. एसटी ही ग्रामीण भागातील गरीब जनतेची एक रक्तवाहीणी, मी तर म्हणेल ती एक कौटुंबिक सदस्य आहे.

आज शहरात ग्रामीण भागात पण बर्‍याचजणांकडे खाजगी वाहने आली आहेत. पण एसटी बसने प्रवास करण्याचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही, आजही ग्रामीण भागात एसटी हेच प्रवासाचे साधन आहे. मामाच्या गावाला जायचयं, माहेरी जायचे आहे, महाविद्यालयात शिकायला जायचयं तर अनेक जण एस टी वर अवलंबून आहेत. आजही हीच एसटी ग्रामीण भागातील अनेक गरीब मध्यम वर्गीय लोकांचे प्रवासाचे साधन आहे.

आज माझ्या वयातील असंख्य डाॅक्टर असतील, कोणी इंजिनिअर असतील, कोणी तहसिलदार कोणी कलेक्टर झाले आहेत. ते त्या काळात फक्त आणि फक्त एसटी बसने प्रवास करूनच. मला आठवते वैद्यकीय शिक्षण घेत असताना एसटी बसचा दिवाळीनंतर की आसपास  २ दिवसांचा संप झाला होता तर माझ्या सोबतच घरातील सर्व चिंतेत होते. संप कधी संपेल, तू परत काॅलेजला कसा जाणार, आपल्याकडे खाजगी वाहन नाही, त्यामुळे सर्वच जण काळजीत. दोन दिवसाच्या संपाने ही परिस्थिती झाली होती. एसटी लगेच सुरू व्हावी म्हणून देवाकडे साकडे घालत होत त्यावेळी लोकांनी..

मला आठवते मला वैद्यकीय विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याआधी सरकारी दवाखान्यात काम करणे आवश्यक होते. मला नंदुरबार जिल्ह्य़ातील अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात दाखल व्हायचे होते. मी राहत असलेल्या अंबाजोगाई येथून अक्कलकुवाला जाण्यासाठी डायरेक्ट एसटी बस तेव्हा नव्हती. अंबाजोगाई ते औरंगाबाद साधारणपणे 5/6 तास प्रवास, तिथून पुढे औरंगाबाद ते धुळे कन्नड घाट रस्ता. साधारणपणे मी अंबाजोगाई वरून सकाळी 10 वाजता निघायचो धुळे येथे रात्री 2 वाजता पोहचायचो, मग काय एसटी स्थानकावरच बाकावर मस्त झोपायचो. डास होते चावायचे पण कधी कोणता आजार होऊ दिला नाही त्यांनी कारण तशी मैत्रीच झाली होती. प्रातःविधी परत स्थानकावरच.  मग तोंड हात धुवून पुढची गाडी सकाळी 6 वाजता धुळे ते अक्कलकुवा..

अक्कलकुवा येथे सकाळी 9 वाजता दवाखान्यात हजर. प्रवास लांबचा होता पण कधी कंटाळा नाही आला. आणि दुसरा पर्याय पण उपलब्ध नव्हता. माझ्या सारखेच असंख्य डाॅक्टर, तहसिलदार, मोठे सरकारी अधिकारी असतील ज्यांच्या कारकिर्दीत एसटी चे खूप मोठे योगदान आहे. आज मात्र ..एसटी….आगारात धुळ खात पडून आहे याचे वाईट वाटत आहे.

न चुकता, न थकता धावते ती आपली एसटी, लालपरी, लालडब्बा..एक प्रवासी असो की दहा की चाळीस. एसटी बस वेळेवरच निघणार हे नक्की. आजही हा नियम मोडला नाही तिने. ग्रामीण भागातील रस्ते त्या वेळीही खराबच होते आजपण परिस्थितीत फारसा फरक नाही पण ती लालपरी आधीपण आणि आजपण ग्रामीण भागातील नागरिकांची जीवनवाहिनी आहे. शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, काॅलेज मध्ये शिकणारे मुलं, ग्रामीण भागात राहून ,परिवारातील सदस्यांना शहरात शिक्षणासाठी ठेऊन. दररोज/ आठवड्यात एकदा येणेजाणे करणारे कर्मचारी सर्वांची सोय, माफत दरात पास काढून करणारी आपली ती एसटी. मला आठवते मी काॅलेज मध्ये असताना ग्रामीण भागातील काही मुले होती त्यांचे दोन वेळचा जेवणाचा डब्बा हा एसटी मधून येत असतं. आताच्या जनरेशन ला कदाचित हे खरे वाटणार नाही.  पटणार नाही….पण तो एक काळ होता.

अहो प्रियसीला भेटायला जसा प्रियकर परिस्थितीवर मात करून जातो ना तशी ही एसटी आजही ऊन वारा पाऊस, खराब रस्ते सगळा त्रास सहन करत आपल्या सामान्य जनतेला  भेटायला जाते. खरच ती एक कौटुंबिक सदस्यच आहे..

एसटी संपावर आता तोडगा निघणे आवश्यक

लोकांकडे खाजगी वाहने आहेत म्हणून कदाचित आज सामान्य माणूस संप असताना देखील शांत आहेत. लाॅकडाऊन आहे जनता बाहेर पडत नाही, शाळा/ काॅलेज बंद आहेत म्हणून कदाचित एसटी बस बंदची दाह जाणवत नाहीये. पण ह्यावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहीजे. लालपरी परत रोडवर फिरली पाहीजे. असंख्य गोरगरीब मध्यम वर्गीय शेतकरी यांची कैवारी आहे ही एसटी. चर्चेतून प्रश्न सुटतात, आता हाही प्रश्न लवकरात लवकर सुटावा म्हणून महाराष्ट्रातील दैवत पांडुरंगाच्या व आई तुळजाभवानीच्या चरणी लीन होऊयात. परत एकदा लालपरी दिमाखात फिरताना दिसू देत.                     एकट्या माणसासाठी फिरणारी एसटी
आज ….एकटी पडली आहे.

डाॅ.सचिन नागापूरकर
एक एसटी प्रेमी अस्थीरोग तज्ञ
पुणे

Screenshot 20211227 1402344603556305344739789
Whatsapp image 2022 01 05 at 1. 18. 18 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये