
पुणे :महापालिका निवडणूक प्रमुख पदावर राजेश पांडे यांच्या नियुक्तीची घोषणा करताच भारतीय जनता पक्षात प्रतिक्रिया उमटू लागल्यावर प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांना सारवासारव करण्यासाठी धावपळ करावी लागली.
भारतीय जनता पक्षात २०१४ साली निवडणूक प्रमुख पद निर्माण करण्यात आले. संपूर्ण प्रचार यंत्रणेवर समन्वय रहावा याकरिता हे पद निर्माण केले. निवडणुकीत उमेदवार नसलेल्या आणि संघटक व्यक्तिला शक्यतो निवडणूक प्रमुखपदी नेमले जाते. त्यानुसार राजेश पांडे यांची नियुक्ती झाली. खासदार गिरीश बापट या पदासाठी इच्छुक होते, असे बोलले जाते.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या निकटवर्तीयांमध्ये पांडे यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षांत कुजबूज चालू झाली. पक्षातील घडामोडींबद्दल खासदार बापट यांची नाराजी वेळोवेळी दिसून आली आहे. त्यातच भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडून पांडे यांच्या नियुक्तीवरून नाराजीचा सूर उमटला. अध्यक्षाना समांतर पद निर्माण केल्याची भावना मुळीक समर्थकांमध्ये पसरली. या हालचाली लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेऊन स्पष्ट केले की, मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुका होतील.
भाजपमधील मानपानाचे नाट्य दिवसभरात संपले. पाटील यांना राजकीय धावपळ करावी लागली. खासदार बापट समर्थकांची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे.







