बालेवाडीतील छठ पूजेत श्रद्धा, आस्था आणि उत्साहाचा संगम… अमोल बालवडकर फाउंडेशन, नॉर्थ कम्युनिटी वेलफेअर सोसायटी व अरविंदकुमार सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयोजन

पुणे : बालेवाडी, हाय स्ट्रीट मैदान येथे उत्तर भारतीय बांधवांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छठ पूजा निमित्त एक भव्य कार्यक्रम पार पडला. या मंगल सोहळ्याचे आयोजन माजी नगरसेवक अमोल बालवडकर फाउंडेशन, नॉर्थ कम्युनिटी वेलफेअर सोसायटी आणि अरविंदकुमार सिंग यांच्या वतीने करण्यात आले होते.
या प्रसंगी उपस्थित भाविकांनी सूर्यदेवाची उपासना करत निसर्ग, कुटुंब आणि समाजाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याचा संदेश दिला. श्रद्धा, भक्ती आणि सामूहिक एकतेचा सुंदर मिलाफ या प्रसंगी पाहायला मिळाला. भगवान सूर्यदेवाला प्रातःकालीन अर्घ्य अर्पण करून चार दिवसांच्या छठ महापर्वाचा शुभ समारोप करण्यात आला. भाविकांनी “छठी मइया की जय” च्या गजरात पूजा पार पाडत, सुख, शांती आणि समृद्धीच्या प्रार्थना केल्या.

कार्यक्रमात अमोल बालवडकर यांच्यासोबत पुणे शहराचे अतिरिक्त पोलिस आयुक्त यांच्या पत्नी किरण शर्मा, माजी नगरसेविका स्वप्नाली सायकर, माजी नगरसेविका संगिता तिवारी, प्रकाशतात्या बालवडकर, गणेश कळमकर, राहुल कोकाटे, उमा गाडगीळ,अस्मिता करंदीकर, प्राजक्ता देवस्थळी, तसेच नॉर्थ कम्युनिटी वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष अरविंदकुमार सिंग आणि सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.



तसेच कोथरूड (उत्तर) विधानसभा मंडलातील पदाधिकारी, महिला सदस्य, कार्यकर्ते व उत्तर भारतीय बांधव सहपरिवार मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या प्रसंगी अमोल बालवडकर यांनी सर्व उत्तर भारतीय बांधवांना शुभेच्छा देत म्हटलं की, “छठ पूजा हा श्रद्धा, संयम आणि आस्थेचा सण आहे. सूर्यदेवाच्या उपासनेद्वारे आपण निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करतो. समाजात एकतेचा आणि भक्तीभावाचा हा संदेश कायम राहो.”



कार्यक्रमात विविध धार्मिक विधी, संगीत, आणि सामूहिक पूजनाच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. छठी मइया आणि सूर्यदेवाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात प्रकाश, आनंद आणि समृद्धी नांदो, अशा शुभेच्छांसह कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.









