सिनेजगत

मी जन्माने मारवाडी पण या कारणामुळे ‘मी मराठीच’ : जितेंद्र जोशी

मुंबई : राजस्थानात जन्माला आलेला मुसलमान राजस्थानी असतो. तसाच महाराष्ट्रात जन्माला आलेला मारवाडी हा मराठी आहे. भाषा ही खूप महत्त्वाची आहे. त्याच्यावरून हिणवलं गेलं. मग मी मराठी शिकलो, अशा शब्दांत अभिनेते जितेंद्र जोशी यांनी आपल्या मराठी असण्याविषयी व मराठी भाषेविषयीच्या भावना व्यक्त केल्या.

अभिनेता जितेंद्र जोशी सध्या ‘नाळ २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. १० नोव्हेंबरला प्रदर्शित झालेला ‘नाळ २’मध्ये त्याने चैत्याच्या खऱ्या वडिलांची भूमिका साकारली आहे. जितेंद्र जोशी ‘झी मराठी’वरील लोकप्रिय कार्यक्रम ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मध्ये सहभागी झाला होता. त्यावेळी त्याने मराठी असण्याची एक साधी व्याख्या सांगितली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अभिनेता जितेंद्र जोशींचा हा व्हिडीओ ‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडे सगळ्यांना सांगते की, “आज तुमच्यामध्ये सुद्धा एक असा कलाकार आहे, जो आपल्याला वाटतो या मातीमध्येच, मराठीच्या मांडीवरच बहुतेक हे लेकूर जन्माला आलेलं असणार आहे. इतकी मराठी त्याच्यामध्ये भिनलेली आहे.”

यावर जितेंद्र जोशी म्हणतो की, “मी जन्माने मारवाडी आहे. मी अमराठी नाही मी मराठीच आहे. राजस्थानात जन्माला आलेला मुसलमान राजस्थानी असतो. तसाच महाराष्ट्रात जन्माला आलेला मारवाडी हा मराठी आहे. पण फक्त एक आहे, घरामध्ये मराठी बोललं जात नव्हतं. त्यामुळे घरातली जी भाषा असते ती तुमची भाषा असते खरंतर. कारण तुम्ही जास्तीत त्या लोकांबरोबर बोलत असता. मग मुंबईत आल्यानंतर मला लक्षात आलं की, जर या क्षेत्रात काम करायचं असेल तर भाषा खूप महत्त्वाची आहे. त्याच्यावरून हिणवलं गेलं. मग मी शिकलो.”

त्यानंतर मृण्मयी जितेंद्रला कविता सादर करायला सांगते. अभिनेता त्याच्या मित्राने लिहिलेली आईवरील एक सुंदर कविता सादर करतो. ही कविता सादर केल्यानंतर जितेंद्र मराठीची व्याख्या सांगतो. तो म्हणतो, “आताची मुलं येऊन भेटतात आणि म्हणतात, तुमचं मराठी काय सॉलिड आहे. तर मी म्हणतो, माझी मराठीची समज चांगली आहे. माझं मराठीचं ज्ञान नाहीये. मराठीचं ज्ञान पाहायचं असेल तर खूप माणसं आहेत. माझी समज चांगली आहे, मला मराठी आवडते. ही माझी भाषा आहे. कारण मला असं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यानंतर जो जय म्हणतो. ज्याच्या अंगावर काटा फुलतो तो मराठी. एवढी साधी व्याख्या आहे मराठीपणाची.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये