वारजे येथील आरक्षित जागेवरील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प लागणार मार्गी : बैठकीत सकारात्मक चर्चा

वारजे : वारजे येथील सर्वे नं ११ येथील आरक्षित जागेवरील प्रस्तावित (STP) मैलापाणी शुध्दीकरण प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यात यावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकरातुन आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनात आज बैठक घेण्यात आली. Pune local news, sewage treatment project
या बैठकीत आरक्षणात बाधित झालेले शेतकरी, मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे रांजेद्र मुठे, बैठकीचे नियोजन करणाऱ्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने, नगरसेवक सचिन दोडके, राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा अध्यक्ष स्वप्निल दुधाने आदी उपस्थित होते.
या बैठकीत शेतकऱ्यांना पुणे महापालिकेमार्फत देण्यात येणारा मोबदला तडजोडीने शेतकऱ्यांसमोर मांडण्यात आला व तो शेतकऱ्यांनी स्वीकारण्यास प्राथमिक तयारी दर्शविली आहे. या बैठकीस वारजे येथील आरक्षणात बाधित होणारे जागामालक ॲड निलेश चौधरी, अनिल बराटे, बाळासाहेब बराटे, सुरेश चौधरी, दिलीप चरवड, ज्ञानोबा ढोणे, माणिक ढोणे, विजय खिलारे, भाऊसाहेब बराटे, दत्तात्रय बराटे व इतर जागामालक उपस्थित होते.

या बैठकीत प्रकल्पा संदर्भात विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने अनेक वर्षापासून रखडलेल्या प्रकल्पास गती मिळण्यात मोठे यश प्राप्त झाले. हा प्रकल्प चालू झाल्यानंतर वारजे , कर्वेनगर परिसरातील मैलापाणी शुद्ध करण्याची मोठी समस्या सुटणार असल्याचे या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणाऱ्या नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी सांगितले.






