महाराष्ट्र

पार्थ पवारांवर अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप.. १८०० कोटींची जमीन
३०० कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये

देवेंद्र फडणवीस यांनी केली भूमिका स्पष्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे.
अंबादास दानवे यांनी फेसबुक पोस्ट करत मोठा जमीन घोटाळा पुढे आणला आहे.  या जमीन घोटाळ्यात १८०० कोटींची जमीन  ३०० कोटींत खरेदी करत स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये भरल्याचा प्रकार त्यांनी उजेडात आणला आहे. हा प्रकार पुढे आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता त्यावर आपले मत वक्त केले आहे.

Fb img 17620776420884188237802217418510

अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की,
उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं.

गंमत तर पुढे आहे..एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल!

Img 20250508 wa00011184667503723765598

दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००!

फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र अशी   घणघणाती टीका दानवे यांनी केली आहे.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  त्यांनी म्हंटले की, या प्रकरणासंदर्भात सगळी माहिती मी मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्डस असतील या संदर्भातील सगळी माहिती मी मागवली आहे. या संदर्भात चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत. सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे, त्या आधारावर जे काय तुम्हाला सांगायच ते मी सांगणार आहे. अजून संपूर्ण माहिती माझ्याकडे आलेली नाही. प्राथमिक दृष्ट्‍या जे मुद्दे समोर येतायत ते गंभीर आहेत. या प्रकरणी माहिती घेऊनच बोलणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये