पुणे शहर

पुण्यात स्पा सेंटर मधील वेश्याव्यवसायावर कारवाईदरम्यान गॅलरीतून उडी मारलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, चार पीडित तरुणींची सुटका

पुणे– विमाननगर मधील एका इमारतीमध्ये सुरू असलेल्या स्पा सेंटर मधील वेश्याव्यवसायाच्या ठिकाणी पोलिसांनी अचानक टाकलेल्या धाडीत पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना एक तरुण व महिला यांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले. दुर्दैवाने या घटनेत गंभीर जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी(दि. 23)रोजी रात्री घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा “पिटा” अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घटनास्थळावरून पीडित चार तरुणींची सुटका करण्यात आलेली आहे.

Img 20260222 wa0006669826703895141779

विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमान नगर येथील सिटी स्पेस बिल्डिंग ऑफिस नंबर 110 पहिला मजला या ठिकाणी “द रूट स्पा” या ठिकाणी अनधिकृत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदर स्पा सेंटरमध्ये बनावट गिऱ्हाईक पाठवलेले होते. सदर बनावट गिऱ्हाईक आत गेल्यानंतर पोलिसांनी आत मध्ये प्रवेश केला. या ठिकाणी असणाऱ्या चार खोल्यांमध्ये चार महिला आणि चार पुरुष मिळून आले. एक बंद खोली मध्ये एक महिला होती. सदर महिलेने दिलेल्या माहितीनुसार, खिडकीच्या गॅलरीतून तिच्यासोबत असणारे एक तरुण आणि एक महिला यांनी उड्या मारलेल्या आहेत. घटनास्थळी प्रत्यक्ष माहिती घेतली असता हॉटेलचा मॅनेजर हुसेन सफिकुल रहमान शेख (वय 28 रा. येरवडा भाजी मार्केट, पुणे ) व एक महिला (वय 37 सध्या रा. पुणे, मुळची बिहारची ) हे दोघे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी तात्काळ त्यांना खराडी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार (पिटा ) मॅनेजर हुसेन शेख, फ्लॅटचा मूळ मालक संतोष जयंत भुतकर (वय 49 रा. युक्तीका अपार्टमेंट, बाणेर, पुणे ) यांच्याकडून फ्लॅट भाड्याने घेऊन वेश्या व्यवसाय करणारा नारायण पुंजाराम धारे (वय 26, रा. निमगाव गुरु,पोस्ट सांगवी टेकाळे, बुलढाणा) मेहता उर्फ आयान अकबर अली आलम (वय 22,रा. खांदवे नगर पुणे ) बाबू पूर्ण नाव माहित नाही या पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून चार पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून दुर्दैवाने एका महिलेचा उपचारादरम्यान या घटनेत मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव करीत आहेत.

….तरी देखील अवैध धंदे व वेश्या व्यवसाय सर्रास सुरूच!!!

पुण्यात विमाननगर येथे घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सातत्याने वेश्या व्यवसाय व अवैध धंदे याबाबत ठोस कारवाई करत असल्याचे बोलत असतात. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नसल्याचे नागरिक सांगतात. शहरात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे व वेश्या व्यवसाय सर्रास सुरू आहे. याबाबत स्थानिक पोलीस मात्र नेहमीच कानावर हात ठेवतात. मात्र त्यांच्या मदतीशिवाय आणि गुन्हे शाखेच्या धुरंधर अधिकारी आणि अंमलदार यांच्या बहुमोल सहकार्याशिवाय हे शक्य नसल्याचे बोलले जाते. स्थानिक पोलीस मित्र, सामाजिक कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवून हे सर्व उद्योग शांततेत सुरू आहेत. शहरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून त्याच्यावर पोलिसांचे नियंत्रण राहिले नसल्याची भावना नागरिक बोलून दाखवत आहेत. पुण्यात अवैध धंदे व वेश्याव्यवसाय सर्रास खुलेआम सुरू आहेत. केवळ कारवाईचा बडगा दाखवून पोलीस त्यांची कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवत आहेत. मात्र ठोस कायदेशीर कारवाई न केल्यामुळे व पोलीस दलातील मिळणाऱ्या बहुमोल सहकार्यामुळे हे सर्व काही अलबेलपणे सुरू आहे. यापूर्वी विमाननगरमध्ये स्पा सेंटर मध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायावर वेळोवेळी कारवाया करण्यात आलेल्या असून देखील अशा प्रकारे घडलेल्या घटनेत एका पीडीतेचा दुर्दैवी मृत्यू होतो ही अतिशय गंभीर बाब आहे. आता तरी पोलीस प्रशासन डोळे उघडे ठेवून कारवाई करेल का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये