सध्या देशात भाजपाविरोधी ट्रेंड त्यामुळे बदल घडेल : शरद पवार
छत्रपती संभाजीनगर : देशातल्या प्रमुख राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही. २०२४ ला लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. सध्या देशात भाजपाविरोधी ट्रेंड आहे. हा ट्रेंड राहिला कायम राहिला तर बदल घडेल हे सांगायला ज्योतिषांची गरज नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
सध्याचा जो ट्रेंड आहे देशात तो भाजपविरोधी आहे. देशाचा नकाशा समोर ठेवला तर आपण केरळपासून सुरुवात करु केरळमध्ये भाजप आहे का? नाही. तामिळनाडू, तेलंगण, आंध्र, कर्नाटक या राज्यांमध्येही त्यांची सत्ता नाही. गोव्यात आमदार फोडून राज्य आणलं. महाराष्ट्रातही तेच केलं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. देशातल्या प्रमुख राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही. २०२४ ला लोकांनी बदल करण्याची भूमिका घेतलेली दिसते. हा ट्रेंड राहिला कायम राहिला तर बदल घडेल हे सांगायला ज्योतिषांची गरज नाही, असं पवारांनी सांगितले.
नाही त्या प्रश्नांना फाजील महत्त्व
आपल्या देशात आणि राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. लव्ह जिहादसारख्या नाही त्या प्रश्नांना फाजील प्रश्नांना महत्त्व दिलं जातं आहे. माध्यमांनीही अशा मुद्दांना अवास्तव प्रसिद्धी देऊ नये.
दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, आदिवासी
केरळमध्ये चर्चेसवर हल्ले झाले. ख्रिश्चन समुदाय हा शांत स्वभावाचा असतो. समजा एखाद्याची चूक झाली असेल तर चर्चेसवर हल्ला करण्याचं कारण काय? या हल्ल्यांमागे विशिष्ट विचारधारा दिसून येते. ती विचारधारा देशहिताची नाही. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज यांना संरक्षण देण्याची गरज आहे. आदिवासी आणि दलित समाज या घटकांना जपणं हेदेखील सरकारचं काम आहे, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.