पुण्यात प्रथमच १५ जानेवारी रोजी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर ‘आर्मी डे परेड’

पुणे : भारतीय लष्कराच्या ‘आर्मी डे परेड’च्या आयोजनाचा मान पहिल्यांदाच पुण्याला मिळाला आहे. त्यानुसार १५ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. या संचलनाद्वारे लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन घडवले जाणार असून, लष्करातील रणगाडे, रॉकेटसह रोबोटिक म्यूल आकर्षण ठरणार आहे.
‘आर्मी डे परेड’ दोन वर्षांपूर्वीपर्यंत दिल्लीमध्ये आयोजित करण्यात येत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम दिल्लीबाहेर आयोजित करण्यात येतो. त्यानुसार २०२३मध्ये पहिल्यांदा बंगळूरु येथे आयोजन करण्यात आले. २०२४ मध्ये लखनऊ येथे आणि आता २०२५चा कार्यक्रम पुण्यातील येरवडा येथील लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या परेड मैदानावर आयोजित करण्यात येणार आहे. दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारित होणाऱ्या या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे.

‘लष्कराचे सामर्थ्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे दर्शन संचलनातून घडवण्यात येणार आहे. रोबोटिक म्यूल हे नवे तंत्रज्ञान आहे. १५ किलोपर्यंतचे वजन वाहू शकणारे, कुठेही चढू-उतरू शकणारे हे म्यूल किमान ४० ते कमाल ५५ अंश सेल्सिअस तापमान सहन करू शकतात. रोबोटिक म्यूल नुकतेच लष्करात समाविष्ट करण्यात आले आहेत. दोन तासांच्या या संचलनातील रोबोटिक म्यूलचा सहभाग आकर्षण ठरू शकेल. आर्मी डे परेडचा अनुभव नक्कीच अविस्मरणीय ठरू शकेल,’ असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
केंद्रीय संरक्षणमंत्री, सरसेनाध्यक्ष, लष्करप्रमुख १५ जानेवारी रोजी पुण्यात असणार आहेत. त्यात सैन्यदल प्रमुख अनिल चौहान, लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी ‘आर्मी डे परेड’ला उपस्थित राहणार आहेत. या वेळी लष्करप्रमुख जवानांना पुरस्कार प्रदान करून संबोधित करणार आहेत.






