माजी पंतप्रधान, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन..

भारताचे माजी पंतप्रधान, प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं वयाच्या 92 व्या निधन झालं. प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना श्वसनास त्रास होत होता. दिग्गज डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार केले जात होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे तर विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.
मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
मनमोहन सिंह 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. एक सन्माननीय अर्थतज्ज्ञ म्हणून ते ओळखले जात. विविध सरकारी पदांवर त्यांनी उत्तमरित्या काम केले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण असायचा. विशेष म्हणजे पंतप्रधान म्हणून त्यांची लोकांचे जीवन सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केले अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली.
राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंग यांनी अफाट बुद्धी आणि सचोटीच्या जोरावर भारताचे नेतृत्व केले. त्यांची अर्थशास्त्राबद्दल असलेली सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. श्रीमती कौर आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. मी एक गुरु आणि उत्तम मार्गदर्शक गमावला, असे ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.






