काय चाललंय वारजे येथील वन खात्याच्या जागेवर ?

वारजे : वारजे मधील शनि मंदिर समोरील वनखात्याच्या जागेत व टेकडीवर गेले अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक संस्था, नागरिक, खाजगी कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्या माध्यमातून विविध प्रकारची हजारो झाडे लावून त्याचे संवर्धन केले जात आहे. पण सध्या या वन खात्याच्या जागेवर तळीरामांचे अड्डे तयार झाले असून सर्वत्र बकालपणा आला आहे. या प्रकारामुळे या भागात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी सांगितले की, या वनखात्याच्या जागेवर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, कमिन्स कंपनी, नेचर डिलाईट क्लब, सुदिक्षा फौंडेशन, वारजे पर्यावरण समिती, उद्यान विभाग पुणे मनपा, स्थानिक सोसायटीचे सभासद ज्येष्ठ नागरिक इत्यादी अनेक संस्थाच्या प्रयत्नातून हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्याचे संवर्धन केले जात आहे. हे करीत असताना कमिन्स च्या वतीने या ठिकाणी पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाक्या व हौदाची व्यवस्था केलेली आहे. या संस्थेची प्रत्येक सभासद आपापल्या वेळेनुसार आठवड्यातून एक दोन दिवस झाडांना पाणी घालणे खुरापत करणे नविन नविन झाडे लावणे माती घालणे त्याचप्रमाणे आपापले वाढदिवसाच्या निमित्ताने याठिकाणी व्रुक्षरोपण करीत आहेत. आज ही टेकडी हिरवीगार झालेली दिसत आहे. या टेकडीवर रोज सकाळ संध्याकाळ हजारो नागरिक या टेकडीवर फिरण्यासाठी व्यायाम व योगा साठी येत आहेत.
परंतु आज या टेकडीवर शेकडो डूक्करे , मोकाट कुत्री, व गायी म्हशी यांच साम्राज्य झालेल आहे. त्याच बरोबर याठिकाणी अनेक मद्य पिणारे लोक तरूण पार्ट्या करीत आहेत. यामुळे या परिसरातील नागरिकांना फिरायला जाण्यासाठी भितीदायक व धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे. फिरायला येणाऱ्या नागरिकांना अंगावर डुक्कर, मोकाट कुत्री धावुन येतात. त्याच बरोबर आता तर सोसायटी मध्ये ही मोकाट जनावरे शिरायला लागली आहे. त्यामुळे परिसर अस्वच्छ गलिच्छ व दुर्गंधी पसरत आहेत.
टेकडीवर ज्याठिकाणी पाण्याचे हौद केलेले आहेत त्या हौदात ही सर्व मोकाट जनावरे बसलेली असतात. या मोकाट जनावरा मुळे लावलेल्या झाडांची नासधुस होत आहे. याविषयी अनेक वेळा मनपा कडे तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.
हीच परिस्थिती सिप्ला हाॅस्पिटल लगत असलेल्या वनखात्याच्या जागेवर आहे. येथे सुध्दा बजाज कंपनी व स्थानिक निसर्ग मित्र परिवार च्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेले आहे त्याठिकाणी सुध्दा हीच दुरावस्था जालेली आहे पाण्याचे पाईप व झाडांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात पोलिसांचे पथक फिरणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वनखात्याचे सेवक व मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी फिरून संबधितांवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.



