सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर सामाजिक समतेसाठी आवश्यक : दिलीप बराटे

वारजे : सावित्रीबाईंचा वसा आणि वारसा सर्व भारतीय स्त्री पुरुषांनी घ्यायला हवा. संत,समाजसुधारक, विचारवंत, साहित्यिक यांनी महाराष्ट्र घडवला आहे. सावित्रीबाई या आद्य शिक्षिका, समाजसुधारक, कवयित्री म्हणून त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. सावित्रीबाईंच्या विचारांचा जागर सामाजिक समतेसाठी आवश्यक आहे असे प्रतिपादन संस्कार मंदिर संस्थेचे अध्यक्ष माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी केले.
संस्कार मंदिर संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, वारजे माळवाडी, राष्ट्रीय सेवा योजना आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बराटे बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.धनंजय त्रिमुखे, उपप्राचार्य प्रा.आशुतोष कसबेकर, प्राध्यापक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डाॅ. धनंजय त्रिमुखे, उपप्राचार्य आशुतोष कसबेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. दीपक शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.स्वप्नील गायकवाड, मराठी विभाग प्रमुख डाॅ.राजेंद्र थोरात यांनी मनोगत व्यक्त केले.

स्त्रियांना सन्मानाचे दिवस ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आले आहेत. ज्योतिबा सावित्रीचा वसा प्रत्येक आधुनिक विद्यार्थ्याने घ्यायला हवा आणि ज्ञानाची कास धरावी असे मनोगत याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व वाणिज्य विभागाचे डॉ.स्वप्निल गायकवाड यांनी व्यक्त केले.
डॉ. राजेंद्र थोरात म्हणाले, ‘गावोगावी हरिनाम सप्ताह तून आध्यात्मिक ग्रंथाचे वाचन केले जाते. फुले शाहू आंबेडकर यांच्या वैचारिक साहित्याचे शाळा,महाविद्यालय, विद्यापीठातून वाचन झाल्यास आधुनिक भारत घडायला वेळ लागणार नाही. याप्रसंगी डॉ. दीपक शिंदे म्हणाले, सावित्रीबाईंचे स्वप्न आपण सर्वांनी पूर्ण करायला हवे. स्त्री शिक्षणाचा वसा आपण घेतला आहे. पण जाती व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत पण त्यामध्ये म्हणावे तसे यश येत नाही. जातीपातीच्या अस्मिता टोकदार बनत चालल्या आहेत. त्यामुळे महापुरुषांना सुद्धा आपण जातीपातीच्या विचारातून बाहेर काढून महापुरुष हे देशाचे असतात हे विचार पुढे येणे महत्त्वाचे आहे.
वाणिज्य विभागाचे प्रमुख डाॅ. देवेंद्र भावे आभार व्यक्त करताना म्हणाले, आधुनिक काळामध्ये विद्येची खरी देवता म्हणून सावित्री मायेचा सन्मान व्हायला हवा सर्वांनी सावित्रीचा वसा वारसा पुढे घ्यायला हवा. विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले आणि सावित्री ज्योती उत्सवाची सांगता झाली.








