‘बाईपण भारी देवा’ ब्लॉकबस्टर; जमवला एवढा गल्ला
पुणे : ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल झाल्याचे दिसत आहे. नुकतंच या चित्रपटाने पहिल्या वीकएण्डला किती कमाई केली, याचा आकडा समोर आला आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एक पोस्ट करत याबद्दल सांगितले आहे.
पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट ठरला आहे. यानिमित्ताने केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत. महिलांमध्ये या चित्रपटाची विशेष क्रेझ दिसून येत आहे.
“माझ्या आयुष्यात आलेल्या असंख्य स्त्रियांच्या आशिर्वादाने हे यश मिळालंय. मला जन्म देणारी आई… सांभाळणारी आजी.. लक्ष ठेवणाऱ्या मावश्या… मला लग्नानंतर सांभाळून घेणारी माझी बायको.. आनंद देणारी माझी मुलगी.. माझ्या प्रत्येक कामात सहभागी असणारी माझी सहकारी, अभिनेत्री आणि माझ्या कामावर प्रेम करणारी स्त्री प्रेक्षक.. हे तुमचं यश आहे. या सिनेमातली प्रत्येक स्त्री जी पाठीशी खंबीरपणे उभी राहिली, तीचं हे यश आहे. मी फक्त निमित्त मात्र!! ही स्वामीआई ची कृपा हा सिध्दीविनायकाचा महाप्रसाद…, असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.