बालभारती-पौड रस्ता कामासाठी रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही. याच भागात पुनर्वसनासाठी पालिका आयुक्त सकारात्मक- दीपक मानकर

पुणे : बालभारती ते पौड रस्ता या नविन प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठी जी घरे पाडण्यात येणार आहेत. त्यामधील रहिवाशांचे याच भागात पुनर्वसन करण्यात यावे. या मागणीसाठी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी या रहिवाशांना याच भागात पुनर्वसन करण्यात येईल. याबाबत महापालिका सकारात्मक असल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे.
यावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर, हर्षवर्धन मानकर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. दीपक मानकर म्हणाले, बालभारती ते पौडरस्ता या नविन रस्त्याबाबत आपण तातडीने निर्णय घेतला याबद्दल वर्तमान पत्रातून वाचले. विकास कामाबाबत आपण जी तत्परता दाखवली त्याबद्दल अभिनंदन. परंतु असे महत्वपूर्ण निर्णय घेताना स्थानिक लोकप्रतिनिधी वा नागरिकांना आपण विश्वासात घेतले नाही याचे आश्चर्य वाटले.
नविन रस्त्याच्या कामासाठी जी घरे पाडण्यात येणार आहेत त्या मधील रहिवाशांना याच भागात पुनर्वसन करून मिळावे. कारण ही लोकं याच भागात मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात. दुर भागात पुनर्वसन झाल्यास उपजिविकेसाठी त्यांना नवे कामधंदे शोधावे लागतील, या भागात रस्त्या बरोबरच जैवविविधता उद्यान व अनेकविध विकास प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्याबाबत लोकांच्या मनात असंख्य शंका व प्रश्न आहेत. त्याबाबत समाधान होईल अशी उत्तरे मिळतील अशी जनतेची अपेक्षा आहे. दीर्घकालीन विकासाला मारक असणारे व लोक हित विरोधी प्रकल्पांना लोकप्रतिनिधी म्हणून आमचा विरोध राहील. जनहिताच्या कार्यासाठी आम्ही जनतेसह तुमच्या सोबत राहू. असेही मानकर म्हणाले.

स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून देवू इच्छितो. शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (एचसीएमटीआर रस्ता) पौडरस्ता भागातून जात आहे. मेट्रो सुरू झाली असून नॅनो रेल देखिल प्रस्तावित असल्याची चर्चा आहे. बालभारती रस्ता, एआरएआय कंपनी व विकसीत होत असलेल्या एसआरए वस्तीच्या वर्दळीचा रस्ता याच भागातून जात आहे.