बीसीसीआयकडून घोषणा : महिला आणि पुरुष खेळाडूंना यापुढे समान मानधन

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंना यापुढे समान मानधन दिलं जाणार असल्याची मोठी घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. जय शाह यांनी ट्वीट करत ही घोषणा केली आहे. महिला आणि पुरुष खेळाडूंमधील भेदभाव दूर करण्याच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल असल्याचं जय शाह यांनी सांगितलं आहे. करारबद्द महिला खेळाडूंसाठी समान वेतन धोरण अवलंबलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.

“बीसीसीआयने भेदभाव दूर करण्याच्या हेतूने पहिलं पाऊल टाकल्याची घोषणा करण्यात मला आनंद होत आहे. बीसीसीआयशी करारबद्ध असणाऱ्या महिला खेळाडूंसाठी आम्ही समान मानधन धोरणाची अमलबजावणी करत आहोत. भारतीय क्रिकेटमधील स्त्री-पुरुष समानतेच्या नव्या युगात आपण प्रवेश करत आहोत. महिला आणि पुरुष खेळाडूंची मॅच फी यापुढे समान असेल,” असं जय शाह यांनी सांगितलं आहे.



जय शाह यांनी ट्वीटमध्ये महिला खेळाडूंना किती मानधन मिळणार याचीही माहिती दिली आहे. “पुरुष खेळाडूंप्रमाणेच महिला खेळाडूंना समान मानधन दिलं जाईल. त्यानुसार कसोटी सामन्यासाठी १५ लाख, एकदिवसीय सामन्यासाठी सहा लाख आणि टी-२० साठी तीन लाख मानधन असेल,” अशी माहिती जय शाह यांनी दिली आहे.
“महिला क्रिकेटर्सना समान मानधन देण्यास मी बांधील होतो आणि त्यासाठी पाठिंबा दिल्याबद्दल मी आभार मानतो. जय हिंद”, असंही जय शाह म्हणाले आहेत.


