“….मग नोटांवर आंबेडकर का नकोत?”, ज्येष्ठ काँग्रेस नेत्याची अरविंद केजरीवाल यांना विचारणा

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केल्यानंतर काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केजरीवाल यांना नोटांवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का नको? अशी विचारणा केली आहे.
मनिष तिवारी यांनी ट्वीट केलं असून नव्या नोटांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. “नोटेच्या एका बाजूला महात्मा गांधीचा आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापा,” असं ते म्हणाले आहेत.

“नव्या नोटांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का नसावा? एका बाजूला महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अहिंसा, घटनावाद आणि समतावाद एका अनोख्या प्रकारे एकत्र येऊन आधुनिक भाराची प्रतिभा उत्तम प्रकारे एकत्रित करेल,” असं मनिष तिवारी म्हणाले आहेत.


