पायांच्या आरोग्यासाठी याचा विचार नक्की करा.

मागील आठवड्यात World Couple Day साजरा झाला.फेसबुक वर बर्याच जणांनी आपआपल्या जोडीदाराचे फोटो पाठवले होते. तेव्हा कोणी आठवत नाही. पण एकाने चप्पल जोडीचा फोटो टाकला होता आणि सांगितले होते की ही खरी जोडी.
गंमत जोक सोडून द्या, पण ही चप्पल बुटांची जोडी खरच खूप महत्वाची आहे.
पादत्राणे…एक अत्यंत महत्वाचा असा भाग आज आपल्या जीवनात झाला आहे. चप्पल, स्लीपर, बुट, मोजडी, खटाव, खेटर, पायताण अशी बरीच नावे आहेत ह्या पादत्राणेला. शरीराचे वजन पेलवणारे आपले पाय व त्या पायांना सुरक्षित व निरोगी ठेवण्याचे काम करत असतात ती आपली पादत्राणे. आपण आपल्या शरीरातील सर्व भागांची काळजी घेत असतोच पण पायाच्या बाबतीत व पादत्राणाच्या बाबतीत मात्र आपले सर्वांचे लक्ष कमी असते. चप्पल आहे, फारसा खर्च नको असा आपला एक समज..

पण ज्या रूग्णांना पाय, टाचा दुखण्याचा त्रास सुरू होतो. तेव्हा त्याला आपल्या पायाचे जास्त महत्व पटते.आज पर्यंत आपण खूप वेळा सौदर्य प्रसाधने वगैरे बद्दल चर्चा ऐकली असेल. चला तर मग आज थोडे पादत्राणांबद्दल बोलूयात.
चुकीची अथवा हलक्या दर्जाची पादत्राणे वापरल्यामुळे पाय दुखणे अथवा टाच दुखी चा त्रास होतो त्या बद्दल माहिती घेऊयात. मला आठवते मी शाळेत असताना मला एकच स्लीपर होती. तीच शाळेत जाताना, बाहेर जाताना, क्रिकेट खेळताना, इतर खेळ खेळताना वापरली जायची. आज मात्र दवाखान्यात जाण्याचा बुट, चालतानाचा, पळण्यासाठीचा, ट्रेकींगला जातानाचा, पाण्यात जातानाचा बुट, स्लीपर असे प्रकार आहेत. माझ्याकडे नाही तर बऱ्याच जणांकडे आज असे वेगवेगळे बुट, शूज, चप्पल चे सेट आहेत. दोन तीन दिवसांची सहल असेल तर गाडीत तीन जणांची वेगवेगळ्या प्रकारच्या पादत्राणांच्या जोड्या व त्यासाठीची वेगळी बॅग असते.
आणि समाजात वावरताना असेही खुप वेळा दिसते की काही लोकांकडे एक पादत्राणांची जोड व्यवस्थीत नाही मग मन हेलावते. अनवणी चालणारी खूप लोकं आहेत. आपण प्रत्येकाने किमान एका गरीब माणसाला ज्याच्या कडे पादत्राणे नाहीत त्याला ती देऊन मदत केली पाहिजे.
जगभराचा विचार केला तर साधारणपणे २००० वर्षे आधी पासून पादत्राणे व त्याच्या बद्दल माहिती मिळते. जनावरांच्या चमड्या पासून ते सिंथटीक मटेरियल पर्यंत ते प्लास्टीक व रबर अशा प्रकारात आज जगभरात पादत्राणे उपलब्ध आहेत. जगभरात पादत्राणे व त्या संबंधित उद्योग खूप मोठ्या प्रमाणात आहे. लाखो करोडो रुपयांचा व्यवहार व लाखो लोकांना आज ह्या उद्योगात व्यवसाय संधी उपलब्ध आहे.
पण मी जेव्हा अस्थीरोग तज्ञ म्हणून ह्या पादत्राण्याकडे बघतो…त्यावेळी त्याचे कारण वेगळे असते. आज दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांपैकी साधारणपणे वीस ते तीस टक्के रूग्णांना पाय दुखणे, टाच दुखणे, पायांची बोटे अथवा पायाच्या बोटांच्या खालील जागा दुखण्याचा आजार आहे. ज्या वेळी ह्या आजारांचा रूग्ण येतो तेव्हा जेव्हा रूग्णांच्या पादत्राण्याची पाहणी मी करतो तेव्हा बऱ्याच रूग्णांमध्ये हे जाणवते की चुकीच्या पादत्राणामुळे रूग्णाला पाय, टाच दुखीचा त्रास आहे. अथवा काही वेगळ्या कारणांमुळे जरी त्रास असेल तरी चुकीच्या पादत्राणामुळे दुखणे वाढत आहे. काही रूग्ण जेव्हा आपल्याला असणाऱ्या ह्या पायदुखीच्या आजारासाठी बऱ्याच डाॅक्टरांचा सल्ला घेतात. हजारो रूपयांची औषधे घेतात. आणि पाया मधील पादत्राणे मात्र कमी किंमतीची हलक्या दर्जाची घालून फिरत असतात.
आपण ज्या वेळी आपली पादत्राणे विकत घेतो त्यावेळी आपण निश्चिंतच काही गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. आपल्या पायांचा त्रास असेल तर नक्कीच आणि आज जरी पायांचा त्रास नसेल पण आपले वजन वाढलेले आहे. आपल्याला काही वैद्यकीय आजार मधूमेह, उच्च रक्तदाब, जन्मतः आपल्या पायाला असणारा बाक, सपाट पाय, आपण करत असणारे काम ह्याचा विचार करून आपण योग्य त्या पादत्राण्याची निवड करणे गरजेचे आहे.
आपण व्यायाम करताना, पळणे, चालणे असेल तर त्यावेळी योग्य तो शूज आपण वापरला पाहिजे.
शूज अथवा चप्पल घेताना तो आपल्या पायाला मऊ, हलका, नरम अशा लेदरचा अथवा कापडाचा असावा. शूज चप्पल दिसायला कशी आहे त्या पेक्षा आपण पायात घातल्यानंतर पायाला किती आरामदायक आहे हे बघितले पाहिजे. आपल्या प्रत्येकाचे पायाचे माप वेगवेगळे असते. जसे आपण आपल्याच मापाचे कपडे घेतो. स्वतः जावून ते खरीदे करतो. तसे पादत्राणे पण आपण स्वतः जावून खरेदी केली पाहिजेत. चप्पल अथवा बूट दोन्ही पायात घालून चालून बघितले पाहिजे. कोठे घट्ट अथवा सैल होत नाहीत ना ते पाहिले पाहिजे.
शक्यतो चप्पल अथवा बूट घेण्यासाठी संध्याकाळी जाणे योग्य. शास्त्रीय कारण असे की संध्याकाळी आपल्या पायाची साईज ही थोडी मोठी झालेली असते. काही उच्चरक्तदाब, मधूमेह असणाऱ्या रूग्णांना पायावरती सूज असते. आणि रात्रभर आराम केल्यानंतर सकाळी ती सूज कमी होते. परत दिवसभर उभे राहिल्यामुळे अथवा चालण्यामुळे संध्याकाळी परत सूज येऊ शकते. त्यामुळे शक्यतो पादत्राणे संध्याकाळी घ्यावीत. ज्यायोगे योग्य त्या मापाचे ते मिळू शकतात. आपण ज्या वेळी उभे राहतो त्यावेळी आपल्या पायाची टाचेची रुंदी 0.5 cm ने वाढते. त्यामुळे आवडलेले पादत्राणे उभे राहून घालून बघावे. साधारणपणे 0.5 cm रुंदीला टाचेच्या बाजूला मोठे व साधारणपणे 1.5 cm पायाच्या अंगठ्याच्या पुढे सैल असावे. ज्यायोगे पायांची बोटे सहज हलू शकतील. चप्पल अथवा शूज मध्ये पायांची बोटे दुमडणार नाहीत ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
काही रूग्णांना समोरील बाजूला टोकदार असणारे शूज घालण्याची सवय असते. त्यामुळे पायांची बोटे दुमडण्याची भीती व परिणामी कायम स्वरूपी बोटांच्या खालचा भाग दुखण्याचा अथवा बोटे वाकडे होण्याचा धोका असतो. पादत्राणे घालुन चालताना थकवा अथवा पायाला जडपणा येणार नाही ह्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मधूमेह असणाऱ्या रूग्णांनी आपली पादत्राणे आपल्याला फार टोचत तर नाहीत ना हे बघितले पाहिजे. नाही तर पायाला जखमा होण्याची भिती असते.
महिलांना वेगवेगळ्या चप्पला वापरण्याची हौस असते. असूदेत ना ती हौस.गरजेप्रमाणे एखाद्या कार्यक्रमानुसार जरूर फॅन्सी चप्पल वापरायलाही काही हरकत नाही. पण रोज तसीच पादत्राणे वापरणे बऱ्याच वेळा घातक ठरू शकते. काही रूग्णांना आम्ही त्यांना असणाऱ्या आजारा प्रमाणे कधी उंच टाचेची तर कधी कमी टाचेची चप्पल वापरण्याचा सल्ला देतो. काही रूग्णांना त्याच्या पायाच्या आकारा प्रमाणे पादत्राणा मध्ये बदल करून घेण्यास सांगतो. पाय, टाच अथवा पायाचा तळवा दुखण्याची कारणे बरीच असतील ही पण चुकीच्या पद्धतीने निवडलेली पादत्राणे हे कारण बऱ्याच रूग्णांमध्ये बघायला मिळते. चला तर मग थोडी चर्चा थोडी माहिती घेऊनच गरजे प्रमाणे पाया संबंधी काही त्रास, दुखण्याचा त्रास असेल तर डाॅक्टरांचा सल्ला जरूर घेऊनच योग्य ती पादत्राणे खरेदी करूयात. आणि आपल्या सुंदर पायांना योग्य ते पादत्राणे घालून पायाचे आयुष्य निरोगी बनवूयात…
“तुम्हारे ये पैर बहूत खूबसूरत है”..
“उसे अच्छे वाले पादत्राण पहनना”
डाॅ. सचिन नागापूरकर
अस्थीरोग तज्ञ



