कोरोना योद्ध्यांचे आपल्यावर मोठे उपकार : प्रिया बेर्डे

वारजे: ज्यांनी कोरोनाच्या काळात नागरिकांची सेवा केली, हव्या असलेल्या अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या, नागरिकांना धीर दिला अशा डॉक्टर, नर्सेस, महापालिकेचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी, पत्रकार यांचे उपकार मानावे तेवढे कमी आहेत. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षा व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी व्यक्त केले.
महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण व कोरोना योद्ध्यांचा सन्मान कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महापालिका सहाय्यक आयुक्त संतोष वारुळे, वारजे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक डॉ. अरुणा तरडे, निवृत्ती येनपुरे, आदी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, डॉक्टर, नर्सेस, पत्रकार यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रिया बेर्डे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गौरी गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बेर्डे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली तर रुग्णवाहिका चालकांना पिपीई किटचे वाटप करण्यात आले.
बेर्डे म्हणाल्या, सध्या कोरोना कमी होतोय असं बोललं जात आहे. हे खरे असेल तर ही चांगली गोष्ट आहे. तरीही आपण आपली व कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोना योद्ध्यांच्या सन्मानामुळे त्यांचा उत्साह वाढणार आहे. यावेळी बोलताना दिपाली धुमाळ म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खरेच कौतुक वाटते कारण कोण एकमेकांना भेटायला, बाहेर पडायला तयार नव्हते अशा काळात कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून काम केले. संतोष वारुळे व मच्छिंद्र पंडित यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची प्रशंसा केली. निवृत्ती येनपुरे यांनी आभार मानले.



