सुप्रिया सुळेंना परमेश्वरही वाचवू शकणार नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई : “गेल्या वेळी सुप्रिया सुळे थोडक्यात वाचल्या. यावेळी परमेश्वरही त्यांना वाचवू शकणार नाही. आमचे प्रयत्न सुरु आहेत. प्रयत्न करणारा प्रत्येकजण यश मिळावं यासाठीच प्रयत्न करत असतो.” असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिले आहे. बारामतीमधील जनता पवार कुटुंबालाच निवडून देणार असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवारांनी व्यक्त केला होता. त्याला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बारामतीत भाजपाकडून ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, त्याचा काही फरक पडणार नाही. सुप्रिया सुळे यांचं काम बोलतं, त्यामुळे त्या निवडून येतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता. बारामतीकरांना कुणाचं बटण कसं दाबायचं, हे चांगलं माहितीये, अशी उपहासात्मक टिप्पणी यावेळी अजित पवारांनी केली होती. “आम्हाला काहीही वाटत नाही. असे खूपजण येतात आणि लक्ष्य करतात. गेल्या ५५ वर्षांत असे कितीतरी जण आले आणि कितीतरी जण गेले. खूप लाटा आलेल्या आणि गेलेल्या बारामतीकरांनी पाहिल्या आहेत. बारामतीकरांना खूप चांगलं माहितीये की कुणाचं बटण कशा पद्धतीने दाबायचं. ते त्या निवडणुकीत त्यांचं काम चोखपणे बजावतील याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही”, असं अजित पवार म्हणाले होते.
“बारामतीमध्ये माझं काम बोलतं. त्यामुळे तुम्ही बारामतीची काळजी करू नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारं कुणी असेल, तर बारामतीकर त्याचा विचार करतील”, असंदेखील अजित पवार म्हणाले होते.