‘बागेश्वर बाबा थोतांड’; गुन्हा दाखल करण्याची भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांची मागणी

शिर्डी : बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे थोतांड आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले आव्हान ते स्वीकारू शकत नाहीत. बाबालोक देवाचे रूप घेऊन लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करताहेत. अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहीजे, अशी भूमिका भाजप नेते, आमदार तथा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी यांनी मांडली आहे.
यावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील बोलताना म्हणाले की, महाराष्ट्र संतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. या समाजसुधारक आणि संतांनी समाज उभा करण्याचं काम केलंय. त्या संतांमध्येच आम्ही देव बघतो. या तथाकथित महाराजांचा वाचाळपणा बंद झाला पाहिजे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
बागेश्वर बाबांनी नेमकं काय केलं
बागेश्वर बाबा यांनी साईबाबांची अक्षरश: खिल्ली उडविली. साईबाबा हे देव असू शकत नाहीत. हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्य साईबाबांना देव मानत नाहीत. त्यामुळे सनातन हिंदू म्हणून मीदेखील साईबाबांना मानत नाही. गिधड की खाल पहनकर कोई शेर नही हो सकता, असे बागेश्वर बाबा यांनी म्हटले आहे. देशभरात साईभक्तांमध्ये बागेश्वर बाबांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या बागेश्वर बाबांविरोधात काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.




