कोश्यारी, सुधांशू त्रिवेदींची हकालपट्टी करा : उदयनराजे भोसले

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी आधुनिक भारताची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. यामध्ये सर्व जातीधर्मांचा सन्मान, सर्वधर्म समभाव अशा लोकशाहीचा गाभा असलेल्या मूल्यांचा समावेश होता. शिवाजी महाराजांचे हे विचार जुनाट ठरवणे हे बुद्धिभ्रष्ट झाल्याचे आणि निर्लज्जपणाचे लक्षण आहे, अशा शब्दांत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांच्यावर अत्यंत तिखट भाषेत टीका केली. उदयनराजे भोसले यांच्या या पत्रकार परिषदेतील अनेक मुद्दे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. यापैकी अनेक मुद्दे भाजपच्या सध्याच्या राजकीय आणि सांस्कृतिक भूमिकेशी फारकत घेणारे आहेत. त्यामुळे आता भाजप उदयनराजे भोसले यांच्याविषयी काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
शिवरायांचा लढा सर्व जातीधर्मांसाठी
जगातील अनेक मोठ्या योद्ध्यांनी लढाया या स्वत:चे स्रामाज्य वाढवण्यासाठी केल्या. पण शिवाजी महाराजांचा लढा हा साम्राज्य वाढवण्यासाठी नव्हे तर या देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी होता आणि आता हे लोक म्हणतात छत्रपतींचा विचार जुना झाला. शिवाजी महाराजांनी आधुनिक भारताची संकल्पना मांडली. सर्वधर्मसमभाव ही संकल्पनाही शिवाजी महाराजांनी मांडली. त्यांनी प्रत्येक जातीधर्माचा आणि प्रत्येक धर्मस्थळाचा आदर केला. इतर धर्मातील लहान मुले, स्त्रिया आणि वडीलधारी लोकांचाही त्यांनी सन्मान केल्याचे उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. भारतात विविध जातीधर्मांचे लोक आहेत. या लोकांना एकत्र ठेवायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी मांडणी केली होती, त्याच आधारावर देश अखंड राहू शकतो. भारतातील लोकशाही अबाधित ठेवायची असेल तर शिवाजी महाराजांचा विचार सोडून चालणार नाही, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
आज लोक समाजाचा फार कमी विचार करतात.आज सगळं मी मी झालं आहे, व्यक्ती केंद्रित समाज झाला आहे. शिवाजी महाराजांचे नुसते पुतळे उभारून किंवा रेल्वे स्थानक आणि विमानतळांना त्यांचं नाव देऊन काय होणार? या गोष्टी झाल्याच पाहिजेत. पण शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे जतन केले नाही, त्यांचे विचार आचरणात आणले नाही तर काय फायदा आहे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

फडणवीसांवर बोलणं टाळलं
भगतसिंह कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यांची जो कोणी पाठराखण करत असेल त्यांना काय बोलणार, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले. आतापर्यंत केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांची बाजू लावून धरली आहे. कोश्यारी आणि त्रिवेदी यांनी वक्तव्यं मी बारकाईने ऐकली आहेत, त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचे दिसत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. उदयनराजे भोसले कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्यावर थेटपणे टीका केली असली तरी देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेबाबत काहीही बोलणे टाळले.
कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी यांची हकालपट्टी करा
मी माझी भूमिका मांडली, स्पष्ट केली. मी कुठल्याही पक्षात असलो तरी राज्यपाल कोश्यारी आणि सुधांशू त्रिवेदी यांची हकालपट्टी झाली पाहिजे, ही माझी मागणी आहे. देवेंद्र फडणवीस काय बोलले, याबद्दल त्यांना विचारा, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले. बाकी नेते काय बोलतात, दॅटस देअर लुकआऊट, नॉट माय लुकआऊट, असे उदयनराजेंनी सांगितले.


